Tue, Sep 25, 2018 11:32



होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकर १५ एप्रिलपर्यंत रजेवर

मुख्यमंत्री पर्रीकर १५ एप्रिलपर्यंत रजेवर

Published On: Mar 06 2018 1:03AM | Last Updated: Mar 06 2018 1:03AM



पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पुढील उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे ते येत्या 15 एप्रिलपर्यंत रजेवर असतील, अशी माहिती पर्रीकर यांचे विश्‍वासू सहकारी आणि आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये  दुसर्‍या टप्प्यातील उपचार घेण्यासाठी सोमवारी रवाना झाले.  

कुंकळ्येकर म्हणाले, पर्रीकर मुंबईत दोन दिवस राहून व तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून अधिक चांगल्या उपचारांसाठी विदेशात  जाण्याविषयीचा पुढील निर्णय घेतील. त्यामुळे ते सुमारे 4 ते 6 आठवडे अथवा एप्रिलच्या मध्यापर्यंत रजेवर असतील. पर्रीकर आजारी असताना  गेल्या पंधरा दिवसांत गोव्यातील समस्त जनतेने त्यांच्यावर दाखवलेले प्रेम तथा  केलेल्या प्रार्थनांमुळे त्यांची प्रकृती सुधारली  आहे. या प्रार्थनांमुळेच ते पुन्हा देशसेवेसाठी पूर्ववत सक्रिय झाले. आताही ते उपचारांसाठी जात असून या आजारातून बाहेर आल्यावर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील, यात शंका नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांनी 15 फेब्रुवारीपासून 8 दिवस मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये स्वादूपिंडाच्या विकारावर उपचार घेतले. तेथून डिस्चार्ज घेतल्यानंतर   डिहायड्रेशन तसेच रक्तदाब कमी झाल्याने गोमेकॉत पाच दिवस उपचार घेतले.  मुख्यमंत्र्यांची प्रकृती सध्या बरी असली तरी ते सोमवारी दुपारी मुंबईला रवाना झाले आहेत. लिलावती इस्पितळातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते पुढील उपचारांसाठी विदेशात जाण्याची शक्यता असल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव रुपेश कामत यांनी सांगितले.