Thu, Apr 25, 2019 13:28होमपेज › Goa › मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली रविवारची विश्रांती 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतली रविवारची विश्रांती 

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:11AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारची सुट्टी कुटुंबासमवेत आराम करण्यात घालवली. संध्याकाळी त्यांनी म्हापसा येथे बोडगेश्‍वर आणि धारगळ येथील भैरवनाथ मंदिरात  जाऊन श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पर्रीकर यांचे दीर्घ उपचारानंतर गुरुवारी राज्यात आगमन झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवसापासून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. डॉक्टरांनी त्यांना पूर्वीप्रमाणे अति काम करण्यास मनाई केली असल्याने ते सुमारे 6 ते 7 तास काम करत आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे  ते सकाळी 8 ते रात्री उशिरापर्यंत काम करत नाहीत. तसेच  दुपारी जेवणाची सुट्टी घेऊन दोनापावला येथे जाऊन घरी भोजन करून विश्रांती घेऊन मंत्रालयात परततात. काही दिवसांसाठी सार्वजनिक ठिकाणी वा कार्यक्रमात जाणे आणि भाषणे देणे पर्रीकर टाळणार आहेत. मात्र, सोमवारी क्रांतिदिनी पर्रीकर आझाद मैदानावरील कार्यक्रमाला हजर राहून आपले मनोगतही व्यक्‍त करणार असल्याची माहिती निकटवर्तीय सूत्रांनी दिली. 

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दि.15 जून रोजी अमेरिकेतून राज्यात दाखल होताच मंत्रिमंडळ बैठक घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार  सोमवार दि. 18 रोजी सायंकाळी 5 वाजता मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे ठरवले आहे. या बैठकीला 12 पैकी 10 मंत्री उपस्थित राहणार असून नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडुरंग मडकईकर हे दोघे अनुपस्थित असतील. सोमवारी सकाळी पर्रीकर वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत जाणार असून त्यानंतर ते क्रांतीदिनाच्या शासकीय कार्यक्रमात सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.