Sun, Aug 18, 2019 15:28होमपेज › Goa › मुख्यमंत्री राज्यात दाखल

मुख्यमंत्री राज्यात दाखल

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 08 2018 1:31AMपणजी : प्रतिनिधी

अमेरिकेत न्यूयॉर्क शहरातील ‘स्लोन केटरिंग केन्सर’ स्मृती रुग्णालयात आठ दिवस उपचार घेतल्यानंतर  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले. अमेरिकेहून पर्रीकर मुंबई येथील विमानतळावर 3.30 वाजता  पोहचले. त्यानंतर एका नियमित वाहतूक करणार्‍या विमानातून ते दाबोळी विमानतळावर दाखल झाले. 

दाबोळी विमानतळावर पर्रीकर यांचे स्वागत करण्यासाठी भाजप घटक सरकारचे अथवा भारतीय जनता पक्षाचे कोणीही उपस्थित नव्हते. पर्रीकर यांनी उपस्थित पत्रकारांशी काहीही न बोलता केवळ स्मितहास्य केले. एका खासगी गाडीने पोलिस बंदोबस्तात तत्काळ ताळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ते रवाना झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री पर्रीकर दि.8 ऑगस्ट रोजी राज्यात परतणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी सांगितले होते. मात्र, राज्यात सत्तांतराच्या व नेतृत्त्वबदलाच्या होत असलेल्या चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या  पार्श्‍वभूमीवर अपेक्षित तारखेच्या दोन दिवस आधीच    गुरूवारी मुख्यमंत्री राज्यात परतले असल्याचे बोलले जात आहे. राज्यात सरकारमध्ये नेतृत्व बदल होऊ शकतो, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करू शकतात, भाजपाचे तीन आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत, अशा प्रकारच्या अफवांमुळे गोवा राज्य गेले तीन दिवस ढवळून निघाले आहे. या अफवा रोखण्यासाठीच पर्रीकर यांनी तातडीने राज्यात परतण्याचा निर्णय घेतला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

मुख्यमंत्री पर्रीकर तीन महिन्यांपूर्वी स्वादूपिंडाच्या आजारावरील उपचारांसाठी   जूनमध्ये अमेरिकेला गेले होते. त्यानंतर, 22 जुलैला सायंकाळी अमेरिकेहून  उपचार घेऊन गोव्यात परतले होते. न्यूयॉर्कमधील ‘स्लोन केटरिंग केन्सर’ स्मृती रुग्णालयात ते उपचार घेत होते. गेल्या महिन्यात 29 ऑगस्ट रोजी त्यांना पुन्हा अस्वस्थ  वाटू लागल्यामुळे आधी मुंबईच्या लिलावती इस्पितळात आणि नंतर अमेरिकेला नेण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि गोमेकॉचे डॉक्टर कोलवाळकर हेही अमेरिकेला गेले होते.