Tue, Mar 19, 2019 12:12होमपेज › Goa › मुख्यमंत्री पर्रीकरांना गोमेकॉतून डिस्चार्ज

मुख्यमंत्री पर्रीकरांना गोमेकॉतून डिस्चार्ज

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) गेल्या 5 दिवसांपासून उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना गुरुवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. पुढील उपचारासाठी त्यांना  शुक्रवारी (दि. 2) पुन्हा मुंबईला नेण्यात येईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्‍त केली. 

पर्रीकर यांचा रक्‍तदाब कमी झाल्याने व डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने रविवारी रात्री गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना गुरुवारी संध्याकाळी गोमेकॉतून डिस्चार्ज देण्याबद्दल गुप्‍तता पाळण्यात आली होती. राखाडी रंगाच्या अर्ध्या बाहीचा शर्ट  परिधान केलेले पर्रीकर जलद पावले टाकत प्रवेशद्वारावरील गाडीत जाऊन बसले. पर्रीकर यांचे दोन्ही पुत्र व स्वीय सचिव, तसेच खासगी सुरक्षा रक्षक वगळता भाजपचा एकही पदाधिकारी अथवा नेता यावेळी उपस्थित नव्हता. पत्रकारांनाही याची माहिती देण्यात आली नव्हती. 

पर्रीकरांच्या गाडीच्या मागे-पुढे पोलिसांची जीप तैनात करण्यात आली होती. त्यांची गाडी थेट दोनापावला येथील खासगी निवासस्थानावर नेण्यात आली. डिस्चार्ज घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर आपल्या निवासस्थानी विश्रांती घेणार आहेत. त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, ते फक्‍त एकच रात्र गोव्यात उपलब्ध राहणार असल्याने गुरुवारी संध्याकाळी सचिवालयातून फायलींचा ढीग दोनापावला येथील पर्रीकर यांच्या घरी हलवण्यात आला आहे.

ट्विटरद्वारे  डिस्चार्जबद्दल आनंद

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमेकॉतून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘ घरी परत आल्याने आनंद वाटला. आपल्या असंख्य प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल आभारी आहे. सर्वांना आनंदी आणि रंगारंग होळी उत्सवाच्या शुभेच्छा.’