Sun, Oct 20, 2019 11:26होमपेज › Goa › विकासाच्या विरोधकांना रोखा : मनोहर पर्रीकर

विकासाच्या विरोधकांना रोखा : मनोहर पर्रीकर

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 7:34AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्यात काही विघ्नसंतोषी लोक  विकासाच्या आड  येत असून प्रत्येकवेळी सध्या गाजणारा कोळशासारखा एखादा विषय घेऊन जनतेत अशांती पसरवित आहेत. परंतु ज्यावेळी ‘सज्जन गप्प बसतात तेव्हाच वाकड्यांचे फावते’ या उक्‍तीनुसार गोमंतकीयांनी उघडपणे अशा लोकांना उत्तर देऊन  विकासाच्या आड येण्यापासून  रोखायला हवे, असे आवाहन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. शुक्रवारी, (दि. 15)  विधानसभेत कोळशासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर विरोधकांना चोख उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी   स्पष्ट केले.   

मळा येथील पुलाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. हेडगेवार हायस्कूलच्या मैदानावर कार्यकर्त्यार्ंची तसेच जनतेची मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित  स्नेहसंमेलनात भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.  व्यासपीठावर आयुष मंत्री श्रीपाद नाईक, खा. नरेंद्र सावईकर, सावर्डेचे आ. दीपक पाऊसकर, पणजीचे माजी आ. सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे सरचिटणीस सदानंद तानावडे, नगरसेवक शुभम चोडणकर व नगरसेवक उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील काही नकारात्मक विचारांची माणसे विकासकामांच्या आड येत आहेत.  यापूर्वी अपघात, वेश्या व्यवसाय, ड्रग्ज, नद्यांचे राष्ट्रीयीकरण आदी विषयांकडे लोकांचे लक्ष वेधत आहेत. कोळसा हा वीज निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, हे माहीत असून व तीच वीज वापरूनही हे लोक कोळशाच्या वाहतुकीला अन ् हाताळणीला  विरोध करीत आहेत. विधानसभेत त्यांना या विषयांवर चोख उत्तर देणार आहोत.

दीपक पाऊसकर म्हणाले, या पुलाची एक बाजू पूर्ण झाली आहे. दुसरी बाजू पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत   पणजीला स्मार्ट सिटी बनविण्याचा आम्ही प्रयत्न करू. श्रीपाद नाईक म्हणाले, विकासाचा रथ पुढे नेण्यासाठी पर्रीकर यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. जनतेच्या पाठिंब्याशिवाय कोणतेच काम साध्य होत नाही. पर्रीकर यांच्यामुळे गोवा विकासाच्या मार्गावरून पुढे जात आहे. यावेळी नरेंद्र सावईकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर यांची भाषणे झाली.