Thu, Apr 25, 2019 17:31होमपेज › Goa › महिन्याआधीच्या बिलात दुरुस्तीचा अधिकार आता केंद्रीय समितीलाच

महिन्याआधीच्या बिलात दुरुस्तीचा अधिकार आता केंद्रीय समितीलाच

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 11 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

वीज ग्राहकांच्या अनेक महिने थकीत असलेल्या वीज बिलात फेरफार वा दुरुस्ती करण्याचा उपविभागीय कार्यालयाचा अधिकार वीज खात्याने काढून टाकला आहे. सदर कार्यालयाला आता आधीच्या एकाच महिन्याच्या बिलांची दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला असून बाकीच्या थकीत बिलांवर केंद्रीय समिती निवाडा करणार असल्याचे मुख्य अभियंता एन. एन. रेड्डी यांनी सांगितले. 

वीज खात्याचे उपविभागीय अधिकारी याआधी भरमसाठ वादग्रस्त बिले दुरूस्त करत असत. मात्र, या दुरूस्तीचा खात्याच्या हिशेबाशी मेळ बसत नसल्याचे आढळून आले आहे. सदर बिलात दुरूस्ती करण्यात आली असली तरी त्याची रितसर माहिती लेखा कार्यालयाला दिली जात नव्हती. यामुळे उपविभागीय अधिकार्‍यांना केवळ आधीच्या एक महिन्याच्या बिलाची दुरूस्ती करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र एक महिन्याहून अधिक जुनी बिले दुरूस्तीसाठी यापुढे खात्याच्या मुख्य कार्यालयात केंद्रीय समितीकडे  पाठवावी लागणार आहेत. यामुळे खात्याच्या व्यवहारात पारदर्शकता येणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. 

रेड्डी म्हणाले की, उपविभागीय अधिकार्‍यांना वीज बिलात दुरूस्तीचा अधिकार दिला गेला असला तरी ते या दुरूस्तीबाबत खात्याला कल्पना देत नसल्याचे आढळून आले होते. यातील काही बिले दोन वर्षांपूर्वीची असल्याचे दिसून आले. यामुळे बिलाच्या रकमेच्या फरकाबद्दल लेखा अधिकार्‍यांकडून अनेक चौकशांना सामोरे जावे लागत असे. त्यामुळेच आता महिन्याहून अधिक काळातील बिलांना फेरफार करायचा झाल्यास केंद्रीय समितीच करणार असल्याचे सर्व अधिकार्‍यांना कळवण्यात आले आहे. 

...तर मीटर रिडर, अधिकार्‍यांना देणार ‘मेमो’

वीज खात्यातील अनेक मीटर रिडर दर महिन्याची बिले काढण्यासाठी ग्राहकांच्या घरी वा आस्थापनांना उशिराने भेट देत असल्याचे आढळून आले आहे. बिले महिन्याच्या आत नोंद करून पाठवण्यात येणार असून याबाबतीत मीटर रिडर वा अधिकार्‍याचा निष्काळजीपणा आढळल्यास त्यांना ‘मेमो’ दिला जाणार आहे. अनेकवेळा समान चुका झाल्यास त्या अधिकार्‍यांवर कारवाईही होऊ शकते, असा इशारा देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.