Tue, Mar 19, 2019 09:13होमपेज › Goa › चेल्ला कुमार या आठवड्यात येणार गोव्यात

चेल्ला कुमार या आठवड्यात येणार गोव्यात

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:03AMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे यांच्या विधानामुळे सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस चेल्ला कुमार या आठवड्यात राज्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आमदार प्रतापसिंह राणे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोमंतकीय युवक परदेशात साफसफाई करण्यासाठी जात असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व  काँग्रेस गट समितीने राणे यांनी या प्रकरणी खुलासा देण्याची मागणी केली होती. महिला काँग्रेस समितीने राणे यांनी गोमंतकीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागण्याची मागणी केली होती. राणे यांनी माफी न मागितल्यास वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी असेही काँग्रेस पदाधिकार्‍यांना वाटत आहे.  

या वादावर प्रतिक्रीया देताना प्रभारी चेल्ला कुमार म्हणाले की, राज्यात सध्या जो वाद सुरू झाला आहे, त्याची आपणाला पूर्ण कल्पना आहे. स्थानिक नेते तसेच आमदार राणे यांच्याशी आपण सतत संपर्कात आहे. या विधानासंदर्भात आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला असून जे टीका करतात, त्यांना आपली बाजू समजली नसल्याचे राणे यांनी आपल्याशी बोलताना सांगितले आहे. यासंबंधी आपण या आठवड्यात गोव्यात येणार आहे. गोमंतकीयांची दुखावलेली मने पुन्हा जिंकणार आहे. 

आमदार राणे यांनी राज्यातील बेरोजगारीवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांचे विधान नकारार्थीरित्या प्रसिद्ध करण्यात आले. या  विधानामागे आपला हेतू चुकीचा नसल्याचा खुलासा राणे यांनी करण्याची आपण सूचना दिली असल्याचे चेल्ला कुमार यांनी सांगितले.