Tue, Apr 23, 2019 08:17होमपेज › Goa › कर्नाटकचा कणकुंबीत तपास नाका

कर्नाटकचा कणकुंबीत तपास नाका

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 12 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याचे मंत्री, जलस्रोत खात्याचे अधिकारी व पर्यावरणप्रेमी म्हादई पाणीप्रश्नी कणकुंबी परिसरात पाहणी करण्यासाठी वारंवार प्रवेश करत असल्याने बेळगाव पोलिसांनी कळसा-भंडुरा कामाच्या परिसरात कणकुंबीत तपास नाका उभा करण्याचे ठरवले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

कणकुंबी परिसरात पाहणी करण्यासाठी गोव्याच्या जलस्रोत खात्याच्या आठ अधिकार्‍यांना दोन दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनी अटकाव करून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यापुढे जर कणकुंबीला यायचे झाले तर बेळगावच्या पोलिस आयुक्‍तांची व प्रशासनाची परवानगी घेऊन या, असा सल्लाही गोव्याच्या पथकाला दोन दिवसांपूर्वी कणकुंबी येथे दिला गेला होता. या घटनेनंतर शुक्रवारी (दि.10) कर्नाटक बेळगाव पोलिसांनी कणकुंबी गावाजवळच पोलिस चेकपोस्ट उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

कळसा-भंडुरा प्रकल्प हा म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळविणारा प्रकल्प आहे. या प्रकल्पाविरोधात गोवा-कर्नाटकचा वाद सुरू असून जलतंटा आयोग व सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आहे. कळसा - भंडुरा प्रकल्पाद्वारे म्हादईचे पाणी कर्नाटकाने भूमिगत मार्गाने वळविले असून त्या संदर्भात स्थिती जाणून घेण्यासाठी गोव्याचे अधिकारी प्रकल्पस्थळी येत असतात, त्यांना अटकाव करण्यासाठी तपास नाका उभारण्याचे कर्नाटकाने ठरवले आहे. कर्नाटकने कशाचीच पर्वा न करता त्या प्रकल्पाचे काम पुढे नेले व पाणीही वळविले गेले, असे गोवा सरकारच्या यंत्रणेचे म्हणणे आहे. गोवा सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिकाही सादर केली आहे. या याचिकेत राज्य सरकारकडून कळसा -भंडुरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन अनेक पुरावे आणि फोटो एकत्रित केले जात आहे. या गोष्टीला हरकत घेऊनही गोव्याकडून कर्नाटकाच्या हद्दीत वाढती घुसखोरी होत असल्याचा दावा करून सदर चेकनाका उभारण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.