Mon, Apr 22, 2019 16:20होमपेज › Goa › ‘बालरथ’साठी विद्यार्थ्यांकडून भाडेवसुली

‘बालरथ’साठी विद्यार्थ्यांकडून भाडेवसुली

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 11:45PMमडगाव : प्रतिनिधी

‘बालरथ’ बसेस चालकांच्या पगारापासून ते मोडतोडीचा सर्व खर्च सरकार उचलते. इंधन खर्च वगळता बसेसवर शाळांना एक रुपयाही खर्च करावा लागत नाही; पण कुडचडे आणि केपे भागातील काही शाळांनी विद्यार्थ्यांकडून वाहतुकीसाठी दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे भाडे वसुली सुरू केली आहे. शिक्षण संस्थांकडून होत असलेल्या लुटीमुळे खिशाला  कात्री लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्‍त केली.

ग्रामीण भागात शैक्षणिक 

सुविधांपासून वंचित विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून शाळेपर्यंतची वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्याच्या हेतूने राज्य सरकारने प्रत्येक शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना बालरथ योजनेअंतर्गत बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांच्या लुटीमुळे बालरथ योजनेच्या मूळ उद्देशालाच काळिमा फासला जात आहे, अशा प्रतिक्रियाही पालकांतून व्यक्‍त होत आहेत.ग्रामीण भागात राहणार्‍या विद्यार्थ्यांना शाळेत येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्यासाठी खास बसेस पुरवण्याची योजना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्या कार्यकालात अंमलात आणली होती. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असलेल्या हायस्कूलबरोबर ही योजना विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांनादेखील लागू करण्यात आली होती. पण काही शैक्षणिक संस्था या योजनेचा गैरवापर करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

केपे आणि कुडचडे भागातील सरकारी अनुदानप्राप्त एका उच्च माध्यमिक विद्यालयाकडून आणि एका हायस्कूलकडून बालरथ योजनेच्या नावावर पालकांची लूट सुरू आहे. त्या विरोधात आवाज उठवल्यास आपल्या मुलांना बालरथमध्ये घेणार नाहीत, या भीतीने पालकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामागे दरमहा एक हजार रुपये देऊन पालक गप्प आहेत. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून बालरथ योजना सुरू करण्यात आली होती. पण आता त्याच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना लुटण्याचा सपाटा शाळांनी लावलेला आहे .

अमोणे केपे येथील पालकांनी  सांगितले की, गेल्यावर्षीसुद्धा आम्ही महिन्याला एक हजार रुपये शाळेत भरले होते. बसचे भाडे म्हणून हे पैसे स्वीकारले जात आहेत. विशेष म्हणजे केपे येथील हे हायस्कूल केपे नगरपालिकेच्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि शाळेने जागेचे सुमारे नव्वद लाख रुपये भाडेसुद्धा भरलेले नाही. पालिकेने या शैक्षणिक संस्थेला सुमारे सव्वा लाख रुपये भाडे लागू केले होते. तेही पूर्ण भरले जात नाही, असा प्रकार समोर आलेला आहे. या शैक्षणिक संस्थेचे प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक असे दोन विभाग सुरु आहेत. शाळेला शिक्षण खात्याने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी बालरथ दिले होते. त्यातून प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांची ने-आण केली जात आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दरमहिन्याला एक हजार रुपये घेतले जात आहेत. आमोणे येथील एका विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, आपण या भागातील एका प्रतिष्ठीत नागरिकाला सांगून बसच्या भाड्याचे पैसे पाचशे रुपये करावेत, अशी मागणी केली होती. पण शाळेकडून त्यास नकार देण्यात आला. सदर प्रकार पालक शिक्षक संघटनेला माहिती आहे, असे त्या म्हणाल्या.

केपेतील बालरथचा विषय ताजा असताना कुडचडे येथील एका निवृत्त शिक्षकाने शैक्षणिक संस्थेकडून  प्रवेशाच्या वेळी वाचनालयाचे शुल्क म्हणून वसूल केली जाणारी रक्कम परत विद्यार्थ्यांना दिली जात नसल्याचा प्रकार उघडकीला आणला आहे. नियमानुसार हे शुल्क विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष संपल्यावर परत दिले जाते. पण या शैक्षणिक संस्थेने वाचनालय शुल्क आणि प्रयोगशाळेचे शुल्क परत मिळण्यायोग्य असूनसुद्धा  परत दिले नाही. आपण शिक्षण खात्याकडे तोंडी तक्रार केली असून  लवकरच लेखी तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार केल्यास  संस्थेवर कारवाई  : भट

बालरथ बससाठी विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारावेत, असे परिपत्रक शिक्षण खात्याने काढलेले नाही. उलट, बालरथ ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीविना शाळेत येता यावे, असा सरकारचा उद्देश आहे. या योजनेचा गैरफायदा घेणार्‍यांविरुद्ध पालकांनी थेट आपल्याकडे तक्रार करावी. संबंधित संस्थेवर कडक कारवाई केली जाईल, असे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी सांगितले.