Sun, May 26, 2019 01:09होमपेज › Goa › पणजीत ‘सेरेंडिपिटी’ची धूम

पणजीत ‘सेरेंडिपिटी’ची धूम

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:24AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सरेंडिपिटी महोत्सवामुळे पणजीत नवनवीन कलाविष्कार पहायला मिळत आहेत. जगप्रसिध्द कलाकारांनी साकारलेल्या कलाकृती महोत्सवात पहायला मिळत असून महोत्सवानिमित्त पणजीत शनिवारी स्थानिक व पर्यटकांची गर्दी झाली होती. महोत्सवास लोकांचा शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रविवार सुटीचा दिवस असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. 

पणजीत ठिकठिकाणी कलाकृती उभारण्यात आल्या असून आकर्षक पध्दतीने चित्रे रंगविण्यात आली आहेत. कांपाल मैदानावर संध्याकाळच्या वेळी होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महोत्सवात आणखी रंगत आली आहे. 

मागील वर्षीपासून पणजीत आयोजित केल्या जाणार्‍या या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महोत्सवात शिल्पकला, हस्तकला, चित्रकला, नृत्याविष्कार, संगीत कार्यक्रम सुरू आहेत. 
आयनॉक्स परिसरात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशाप्रकारे बनवाव्यात, यावरही चित्रिकरणाव्दारे तज्ज्ञ माहिती देत आहेत. बांबुपासून विविध कलाकृती बनविणे, विज्ञानाचे प्रयोग दाखविले जात असून काही प्रयोग हे खेळाच्या माध्यमातून शिकविले जात आहेत. त्यामुळे  ते समजून घेणे फार सोपे जात आहे. 

आदिलशहा पॅलेस, आयनॉक्स परिसर, कलाअकादमीत विविध कार्यक्रम होत असून ही ठिकाणे आनोख्या कलाकृतींनी सजविण्यात आली आहेत. कॅप्टन ऑफ पोर्टस् जेटी, सांता मोनिका जेटी, पीडब्ल्युडी काँम्प्लेक्स, दयानंद बांदोडकर मैदान, बँटो मिगुएल, जुने गोमेकॉ या परिसरात यंदा महोत्सवाची धूम सुरू आहे. 

सांतामोनिका जेटीवर आज ‘रिव्हर रागा’

सरेंडिपीटी महोत्सवात रविवारी आदिल शहा पॅलेसमध्ये ‘बेअरफूट स्कूल ऑफ आर्ट’, ‘जाली’ व ‘द पानो बाजू’ , ‘सोनिक सिटी’  ही प्रदर्शने पहायला मिळणार  आहेत. ‘बैठक’ हे संगीत विषयावर आधारित सादरीकरण होईल. दयानंद बांदोडकर मैदानावर धमाल, कोक स्टुडिओ, अ नाइट इन हरलेम व स्टार्स इन दि न्यू स्काय हे कलाकारांचे सादरीकरण तर सांतामोनिका जेटीवर रिव्हर रागाचे सादरीकरण होईल. दुपारी 3 ते 4 दरम्यान,  पीडब्ल्यूडी कॉम्प्लेक्समध्ये ‘डम्ब वेटर’ व संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत कला अकादमी येथे ‘बंदीश’ हे नाट्य सादर केले जाईल. बांदोडकर मैदानावर रविवारी नृत्य प्रकारात संध्याकाळी 7 वाजता ‘शिव यीन’ आणि रात्री 8.30 वाजता ‘पुरूष’ हे नृत्य सादर केले जाईल. आदिल शहा पॅलेसमध्ये दुपारी 12 वाजता ‘जागरण शार्टस’ चे चित्रीकरण होणार असून दुपारी 3 वाजता क्रिस्टीज कॉन्क्लेव हे चर्चासत्र होईल. अन्य ठिकाणांवरही प्रदर्शने, चर्चासत्र, नृत्य, नाट्य सादरीकरण व चित्रीकरण सुरू आहे.