होमपेज › Goa › बार्ज मालकांना कर्जफेडीसाठी केंद्राचा दिलासा

बार्ज मालकांना कर्जफेडीसाठी केंद्राचा दिलासा

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:32AMपणजी : प्रतिनिधी

खाणबंदीमुळे अडचणीत आलेल्या राज्यातील बार्ज मालकांना कर्ज दिलेल्या बँकांना कर्जफेडीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी केंद्रीय वित्त सचिवांना गोव्यातील सर्व बँकांना बार्ज मालकांच्या कर्जवसुलीबाबत सबुरीचे धोरण स्वीकारण्याचे निर्देश देण्यास सांगितले आहे, असे बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष  रेमंड डिसा यांनी सांगितले. 

बार्ज मालक संघटनेच्या काही सदस्यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शुक्ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या निवेदनात राज्यातील बार्ज मालकांना   विविध सरकारी वित्तीय संस्थांकडून  सुमारे 100 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्याची मागणी करण्यात आली होती. या मदतनिधीतून बार्जमालकांना बँकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यास मदत होणार असल्याचे निवेदनात म्हटले  होते. या निवेदनानंतर शुक्ला यांनी केंद्रीय वित्त खात्याच्या सचिवांना गोव्यातील सर्व बँकांना बार्ज मालकांच्या कर्जांच्या  वसुलीबाबत सौम्य व क्षमाशील धोरण स्वीकारण्याची सूचना केल्याची माहिती  डिसा यांनी दिली. 

दरम्यान, राज्यस्तरीय बँकिंग समितीची पणजीत सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत बार्ज मालकांनाही बोलावण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शुक्ला  यांच्या सूचनेवर विचारविनिमय करण्यात आला. सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बार्ज मालकांच्या कर्जवसुलीबाबत सहा महिने काहीही कारवाई न करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. यामुळे बार्ज मालकांना किमान सहा महिने तरी बँकांचा तगादा लागणार नसल्याचे डिसा म्हणाले.