Thu, Sep 20, 2018 08:16



होमपेज › Goa › रानकुत्र्यांचा हल्ला; चौदा शेळ्या ठार

रानकुत्र्यांचा हल्ला; चौदा शेळ्या ठार

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:33AM

बुकमार्क करा




कसाल : वार्ताहर 

पोखरण-धनगरवाडी येथील लक्ष्मण जानू गावडे यांच्या शेळ्यांच्या कळपावर तांबळाचा माळ परिसरात शनिवारी रानकुत्र्यांनी हल्ला करत 14 शेळ्या ठार केल्या. यामुळे गावडे यांचे सुमारे 76 हजारांचे नुकसान झाले आहे. या अनपेक्षित प्रकाराने परिसरातील शेतकरी हादरून गेले आहेत. वनविभागाने यापोटी भरपाई द्यावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. तब्बल 15 दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.

लक्ष्मण गावडे हे 23 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे शेळ्या गावातीलच  तांबळाचा माळ या जंगलमय परिसरात चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी 7 च्या सुमारास ते शेळ्यांचा कळप घेऊन घरी परतत असताना  वाटेत  15 ते 16 रानकुत्र्यांनी शेळ्यांच्या कळपावर अचानक हल्ला केला. गावडे यांनी  आराडाओरड करत या कुत्र्यांना हुसकवण्याचा प्रयत्न केला असता, काही कुत्र्यांनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तिन्हीसांजेची वेळ व निर्मनुष्य परिसर यामुळे गावडे हतबल ठरले. रानकुत्र्यांनी काही शेळ्यांचे मृतदेह जंगलात लांबविले. 24 डिसेंबर रोजी  स्थानिक वन अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी   पंचनामा केला.