Fri, Jul 19, 2019 05:04होमपेज › Goa › काजू बागायतीत शेतकर्‍यांनी आंतरपीक घ्यावे : राऊत 

काजू बागायतीत शेतकर्‍यांनी आंतरपीक घ्यावे : राऊत 

Published On: May 08 2018 1:54AM | Last Updated: May 07 2018 11:08PMवाळपई : प्रतिनिधी

शेतकरी बांधवांनी आपल्या बागायतीत आंतरपीक घेऊन उत्पन्नात वाढ करायला हवी. यासाठी विविध प्रकारच्या आंतरपिकांचे कौशल्य उपलब्ध असून इच्छूक शेतकर्‍यांना आंतरपीक घेण्याबाबत कृषी विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. शेतकर्‍यांनी आंतरपिके घेण्यासाठी पुढाकार घेऊन आपले उत्पादनात वाढ करावी, असे आवाहन वाळपई विभागीय कृषी अधिकारी प्रकाश राऊत यांनी केले.

धावे-सत्तरी येथील शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शेतकरी कल्याण कौशल्य कार्यशाळेत ते बोलत होते. सत्तरी तालुक्यात काजू बागायती मोठ्या प्रमाणावर आहेत. काजूचे उत्पादन वर्षातून केवळ चार महिन्यांच्या कालावधीत येते. या बागायतींमध्ये आंतरपिके घेतली तर शेतकर्‍यांना वर्षभर उत्पन्न मिळू शकते. आंतरपीक घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना करण्यात येईल, असेही पुढे बोलताना राऊत म्हणाले.

उत्पादन कौशल्य या विषयावर बोलताना ते म्हणाले की, काजू बागायतीत मिरीचे आंतरपिक घेणे फायदेशीर आहे. ओल्ड गोवा कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी चिदानंद प्रभू यांनीही यावेळी विविध विषयावर मार्गदर्शन केले. वाळपई पशुसंवर्धन खात्याचे पशुवैद्यकीय अधिकारी शिरीष बेतकेकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल याबाबतच्या टिप्स व जनावरांची काळजी याविषयी विचार मांडले. वाळपई विभागीय कृषी कार्यालयाचे अधिकारी दिग्विजय शेगावकर यांनी अळंबीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे उत्पादन कसे घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले. अळंबी उत्त्पादनासाठी स्वयंसहाय्यता गटाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेता येईल, असेही ते म्हणाले.

स्थानिक पंचसदस्य गोपिका गावकर व माजी पंचसदस्य तथा प्रगतशील शेतकरी रमेश जोशी यांनीही विचार मांडले. गोवा मार्केटिंग फेडरेशनचे अर्जुन नाईक यांनी नारळ उत्पादनाबाबत उपयुक्त माहिती कार्यशाळेत दिली. कृषी अधिकारी रमेश गावस यांनीही मार्गदर्शन केले.