Thu, Feb 21, 2019 21:21होमपेज › Goa › राज्यात १० फेब्रुवारीपासून कार्निव्हलची धूम!

राज्यात १० फेब्रुवारीपासून कार्निव्हलची धूम!

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:22AMपणजी : प्रतिनिधी

‘खा प्या मजा करा’, असा संदेश देत राज्यात 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान होणार्‍या कार्निव्हलनिमित्त पणजीत 9 ते 13 फेब्रुवारी या काळात अन्न व संस्कृती महोत्सव होणार असल्याची माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली. यावर्षीच्या कार्निव्हलमध्ये प्रथमच गोवा पोलिसांचे पथक सहभागी होणार आहे. रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, अमली पदार्थ यांसारख्या सामाजिक विषयांवर पोलिसांकडून जागृती केली जाणार आहे. 

कार्निव्हल परेडची सुरवात 10 फेब्रुवारीला पणजी येथून होईल. त्यानंतर 11 फेब्रुवारीला मडगाव, 12  फेब्रुवारीला वास्को व 13 फेब्रुवारी रोजी  म्हापसा येथे कार्निव्हल परेडचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्निव्हल पाहण्यासाठी दरवर्षी गोव्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक येतात. पर्यटकांबरोबरच स्थानिक लोकदेखील कार्निव्हल पाहण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कार्निव्हलनिमित अन्न व संस्कृती महोत्सव पर्यटन खात्यातर्फे आयोजित केला जातो.

यंदाही हा महोत्सव होणार आहे. परंतु पणजीत नक्की तो कुठे होणार त्याचे  ठिकाण निश्‍चित करण्यात आलेले नाही. याशिवाय महोत्सव काळात मनोरंजनासाठी खास सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन संध्याकाळच्या वेळी केले जाणार आहे.