Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Goa › केपे नगराध्यक्ष राऊल परेरांचा राजीनामा

केपे नगराध्यक्ष राऊल परेरांचा राजीनामा

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMमडगाव : प्रतिनिधी

केपे नगराध्यक्षपदाचा आपण राजीनामा दिल्याची माहिती नगरपालिकेचे नगराध्यक्ष राऊल परेरा यांनी शुक्रवारी दिली. आणखी दोन महिन्यांच्या अवधी मिळाला असता तर पालिका क्षेत्रात नियोजित विकासकामे राबवता आली असती, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

ते म्हणाले, की बाजार प्रकल्पाची पायभारणी करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा अवधी वाढवून द्यावा, अशी मागणी आपण आमदार बाबू कवळेकर यांच्याशी केली होती. पण आमदार कवळेकर यांनी ते शक्य नसल्याचे सांगून इतर नगरसेवकांशी चर्चा करून निर्णय घेण्यास सांगितले.आमदार कवळेकर यांनी स्वातंत्र्यदिना नंतर राजीनामा देण्यास सांगितल्याने आपण गुरुवारी राजीनामा दिला. राजीनामा मागे घेण्यासाठी सात दिवसांचा अवधी आहे तरी आपण राजीनामा मागे घेणार नाही.

मोडकळीला आलेली बाजार इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत बांधण्यासाठी आठ वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष मॅन्युअल कुलासो यांनी प्रयत्न केले होते. पण त्यांना ते शक्य झाले नाही. आपण प्रयत्न करून ती धोकादायक इमारत रिकामी केली.तेथील व्यापार्‍यांना दुसर्‍या जागी स्थलांतरित केले. व्यापार्‍यांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावले या कामात माजी मंत्री प्रकाश वेळीप यांचे आपणाला मोलाचे सहकार्य लाभले असे ते म्हणाले.ही इमारत पडताना नगरसेवक अमोल काणेकर यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा बोलवता धनी दुसराच कोणी होता अशी टीका परेरा यांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत असल्याने अर्थपुरवठयाच्या फाईलवर स्वाक्षरी झाली नाही अन्यथा पायभारणी फार पूर्वीच झाली असती. या बाजार प्रकल्पाच्या इमारतीसाठी आपणच मेहनत घेतली आहे, असा दावाही त्यांनी केला. आपल्या कार्यकाळात तालुका वाचनालय सुरू करण्याबरोबर, भाट येथील सरकारी वसतिगृह पडण्याचे काम केले असून त्या ठिकाणी आता दीड कोटी रुपयांचा नवीन सभागृह येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

आपल्या कार्यकाळात घर पट्टी लागू करण्यात आली,  प्रभाग चार आणि घरांना क्रमांक देण्यात आले असून त्या माध्यमातून पालिकेला पंधरा लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. गणेशोत्सव मंडळाकडून पालिका उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. प्रत्येक प्रभागात एकूण अडीज कोटींची विकास कामे केली आहेत. रोजंदारीवर काम करणार्‍या कामगारांना कायम स्वरूपी सेवेत दाखल करून घेण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडून फाईल मंजूर करून घेण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आमदार बाबू कवळेकर यांच्या पॅनलमधून आपण निवडून आलेलो नाही असे सांगून परेरा आपण सेव्ह गोवा पक्षाच्या समितीवर होतो. पण सेव्ह गोवा पक्ष आता बरखास्त झालेला आहे. अद्याप आपण काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही. आमदार कवळेकर यांना आपण बाहेरून पाठिंबा दिला होता. आता भविष्यात त्यांना पाठिंबा द्यावा की नाही याचा विचार करावा लागणार आहे.