Sun, Aug 18, 2019 14:21होमपेज › Goa › ‘हॉस्पिसियो’त कर्करुग्ण मुलीचा मृत्यू

‘हॉस्पिसियो’त कर्करुग्ण मुलीचा मृत्यू

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMमडगावः प्रतिनिधी

पेवल परेरा या मांडोप नावेली येथील नऊ वर्षीय कर्करोगग्रस्त मुलीला अधिक उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून गोमेकॉत नेण्याच्या तयारीत असताना व तातडीने रक्‍तपुरवठा न झाल्याने बुधवारी मृत्यू झाला.
चिमुकलीला रुग्णवाहिकेतून गोमेकॉत इस्पितळाकडे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यास  दिरंगाई झाल्याने व  वेळेत रक्‍तपुरवठा न झाल्याने बुधवारी  जीव गमवावा लागला. हॉस्पिसियोतून अधिक उपचारांसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठविण्यासाठी गंभीर अवस्थेत या चिमुकलीला रुग्णवाहिकेत घालण्यात आले होते.पण रुग्णवाहिकेतून एकाहून अधिक रुग्ण घेऊन जाण्याचे हॉस्पिसियोचे धोरण पेवल हिच्यासाठी जीवघेणे ठरल्याचे सांगून पेवलच्या कुटुंबीयांनी  ‘हॉस्पिसियो’चा निष्काळजीपणाच पेवलच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा दावा केला.

या घटनेमुळे मांडोप भागात शोककळा पसरली असून पेवल हिच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हॉस्पिसियो कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पेवल हिच्या कुटुंबाने केली आहे. पेवलच्या पश्‍चात आई,वडील आणि भाऊ,बहीण असा परिवार आहे.पेवल ही इयत्ता सातवीत शिकत होती.पण कर्करोग झाल्यानंतर तिने शिक्षण सोडले होते. ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.पेवलचे वडील अविटो परेरा यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले,की पेवल हिला कॅन्सर झाल्याचे निदान दोन वर्षांपूर्वी झाले होते.दोन वर्षा पासून तिच्यावर विविध इस्पितळात उपचार सुरू होते.तिला वाचविण्यासाठी आपण यथाशक्ती प्रयत्न केले होते.घरची परिस्थिती बेताची असूनही तिच्यावर टाटा मेमोरियल मध्ये उपचार केल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारी पेवल हिला गोमेकॉत रक्त बदलण्यासाठी नेण्यात येणार होते.पण बुधवारीच तिची तब्येत बिघडू लागल्याने तिला बुधवारी सकाळी हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तिला रक्त पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे, असे डॉक्टरकडून आविटो यांना सांगण्यात आले.तिचा रक्तदाब पुन्हा पुन्हा खाली उतरू लागल्याने तिची अवस्था गंभीर बनल्याने तिला गोमेकॉत दाखल करणे गरजेचे आहे,असे कुटुंबीयांना सांगण्यात आले.

गोमेकॉकडे जाण्यासाठी रुग्णवाहिका तयार होती.त्यात एक रुग्ण आधीपासूनच घालण्यात आला होता.ऑक्सिजन मास्क लावून पेवल हिला रुग्णवाहिकेत घालण्यात आले.तिची अवस्था बिघडत चालली होती. या विषयी तिचे नातेवाईक एडलर डिसौजा यांनी परिचारिकेला सांगितले असता, दोन रुग्ण घेऊन रुग्णवाहिका गोमेकॉत जाऊ शकत नाही.अपघातांचे अन्य दोन रुग्ण आहेत.त्यांना घेऊन रुग्णवाहिका जाणार असल्याचे उत्तर तिने दिले.त्या दोघा रुग्णांना खाली रुग्णवाहिकेत आणेपर्यंत तिची तब्येत आणखीनच बिघडली होती.अखेर गोमेकॉत नेण्यापूर्वी रुग्णवाहिकेतच तिची प्राणज्योत मालवली.

पेवलचे निधन झाल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्यने तिचे नातलग आणि नावेली येथील ग्रामस्थ इस्पितळात दाखल झाले.सर्वांनी मिळून हॉस्पिसियोच्या अधीक्षक डॉ आयरा यांची भेट घेतली. डॉ.आयरा यांनी निष्काळजीपणाचा आरोप फेटाळून लावला.  

हॉस्पिसियो प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा पेवल हिच्या कुटुंबीयांनी निषेध केला आहे.रुग्णवाहिका सर्व रुग्णांना घेतल्या शिवाय जाणार नाही, हे पूर्वीच आम्हला सांगितले असते तर आम्ही खासगी गाडी करून तिला गोमेकॉत नेले असते, असे पेवलच्या आत्या पिएदाद परेरा यांनी सांगितले.वीस मिनिटे तिला गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले होते.अपघातग्रस्त रुग्णाला तिच्या वरच्या बर्थ वर घातले जाणार होते.त्याचा आम्ही विरोधही केला होता, असेही त्या म्हणाल्या.

चालकाची उडवाउडवीची उत्तरे अन् पलायन

अन्य एक रुग्णवाहिका हॉस्पिसियोत पार्क होती.तिचा वापर करून पेवल हिला गोमेकॉत न्यावे किंवा रुग्णवाहिका लवकर तरी सोडावी, अशी विनंती पेवल हिचे नातेवाईक एडलर डिसौजा यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाकडे केली असता, ‘तुम्ही आपल्याला त्रास देऊ नका, डॉक्टरांना  विचारा’ अशी उडवाउडवीची उत्तरे त्याने दिली. पेवलचा मृत्यू झाल्याचे समजताच त्या चालकाने तिथून पलायन केले.  डॉ.आयरा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जावी तसेच अशा प्रकारच्या वाढत्या घटनांची जबाबदारी घेऊन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी लोकांनी यावेळी केली.

निष्काळजीपणा नाहीच ः डॉ. आयरा

डॉ आयरा यांनी   हॉस्पिसियोच्या निष्काळजीपणामुळे पेवल हिचा मृत्यू झाल्याचे आरोप फेटाळून लावले.त्या म्हणाल्या, गोमेकॉची रुग्ण होती, आणि केवळ तिच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यामुळे तिला हॉस्पिसियोत भरती करण्यात आले होते. तिची तब्येत पूर्वीपासून गंभीर होती.पण हॉस्पिसियोमध्ये तिच्यावर सर्व उपचार करण्यात आले.  खास केस असेल तरच वेगळी रुग्णवाहिका पुरवली जाते,अन्यथा नाही असेही त्या म्हणाल्या.

‘गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका हवी’

माजी नगरसेवक आणि हॉस्पिसियोच्या अस्थायी समितीचे सदस्य जॉनी क्रस्टो यांनी  सांगितले की, प्रत्येक बैठकीत आम्ही रुग्णवाहिकेतून रुग्णांना नेण्यासंबंधी सूचना केली होती. पण डॉ. आयरा यांनी कधीच ते मनावर घेतले नाही. गंभीर अवस्थेतील रुग्णांना स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अन्यथा असले प्रकार नियमित घडत राहतील.