Fri, Jan 18, 2019 10:54होमपेज › Goa › पीडीए रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण

पीडीए रद्द करा, अन्यथा बेमुदत उपोषण

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:50PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व पीडीए रद्द करा, या मागणीसाठी गोंयकार अगेंस्ट पीडीएतर्फे बुधवारपासून पणजी येथील आझाद मैदानावर साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली. 9 ते 13 मे असे पाच दिवस हे आंदोलन सुरु राहणार आहे.

सरकारने 13 मे पर्यंत पीडीए रद्द  करण्याचा निर्णय  न घेतल्यास  गोंयकार अगेंस्ट पीडीए या संघटनेकडून बेमसुदत उपोषण केले जाईल, असा इशारा संघटनेचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी यावेळी दिला.

डिसोझा  म्हणाले, की  नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी ग्रेटर पणजी पीडीएतून सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील गावे वगळण्यात येतील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, या आश्‍वासनाला अनेक दिवस उलटले असूनही ही गावे ग्रेटर पणजी पीडीएतून वगळण्यात आल्याची अधिसूचना जारी करण्यात आली नाही. आम्हाला तोंडी आश्‍वासने नको. कृती हवी असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यातील म्हापसा, कळंगुट, कांदोळी, नागोवा, पर्रा, सिक्केरी या  गावांचादेखील पीडीएत  समावेश करण्यात आला आहे. मूळात  सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या पीडीए या घटनाबाह्य आहेत.  त्यामुळे  केवळ ग्रेटर  पणजी पीडीएच नव्हेत तर राज्यातील सर्व पीडीएच रद्द होणे आवश्यक आहे. विकासाच्या नावाने  पीडीएव्दारे गावे नष्ट होण्याची भीती आहे. सरकारने पीडीए विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज आहे. साखळी उपोषण हे केवळ  एक झलक असून  पीडीए रद्द न केल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही डिसोझा यांनी दिला.

साखळी उपोषणात  म्हापसा, कळंगुट, कांदोळी, नागोवा, पर्रा, सिक्केरी व पीडीएत समावेश करण्यात आलेल्या सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघ गावांतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी यावेळी पीडीए विरोधी फलक हातात घेऊन घोषणा दिल्या.