Thu, Apr 25, 2019 07:28होमपेज › Goa › काणकोणातील मच्छिमारांच्या समस्या महिनाभरात  सोडवणार

काणकोणातील मच्छिमारांच्या समस्या महिनाभरात  सोडवणार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:29PM

बुकमार्क करा
काणकोण: प्रतिनिधी

काणकोण तालुक्यातील मच्छिमारांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित  समस्या सोडविण्यासाठी एका महिन्याच्या कालावधीत सर्व मच्छिमार व्यावसायिकांचा मेळावा भरवून व संबंधित शासकीय अधिकार्‍यांना बोलावून त्यावर योग्य तोडगा काढणार,असे आश्‍वासन मच्छिमार खात्यांचे मंत्री विनोद पालयेकर यांनी आगोंद येथे बोलताना दिले. मच्छिमारांच्या मत्स्योद्योग खात्याशी निगडीत  समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने  आगोंद धवळ खाजन येथील सभागृहात मच्छिमारांशी वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्याच्या समवेत व्यासपीठावर आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई, पंच शिल्पा पागी, मदिरी वेळीप, मडगाव रविंद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक, लोलयेचे सरपंच अजय लोलयेकर माजी सरपंच व गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, अखिल गोवा क्षत्रिय पागी समाजाचे अध्यक्ष सुरज पागी, फिशरीज फेडरेशनचे सहाय्यक संचालक चंद्रकांत वेळीप अन्य मान्यवर उपस्थित  होते.

मच्छिमारांच्या समस्या सोडवण्याला गोवा फॉरवर्डने प्राधान्य दिले आहे. पारंपरिक मासेमारी व्यवसायाला मारक असलेल्या बूल ट्रॉलिंग व एलईडी मासेमारीला आळा घालण्याचे कार्य मत्स्योद्योग   मंत्री विनोद पालयेकर यांनी केले आहे, असे मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. माटये खोला तसेच आगोंद भागातील समुद्र किनार्‍यावर होड्या नांगरण्यांसाठी  मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. समुद्रावरील पायवाटांवर प्रतिबंध तसेच सीआरझेडच्या  जाचक नियमांमुळे आपल्या घराची दुरूस्ती करण्यात अडचणी येत  असल्याचे शेखर पागी, नंदु पागी यांनी सांगितले. तळवण जेटीची बांधणी व खाडीची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी रूद्रेश नमशीकर यांनी केली. प्रदीप पागी तसेच इतरांनी आपल्या समस्या मांडल्या.