Thu, Apr 25, 2019 03:27होमपेज › Goa › काणकोणचा सर्वांगीण विकास साधणार

काणकोणचा सर्वांगीण विकास साधणार

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:52AM

बुकमार्क करा
काणकोण : प्रतिनिधी

काणकोण मतदारसंघाचा आमदार भाजपचा नसला तरी, काणकोण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधणार असून विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही,  असे  आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काणकोण येथे दिले.                                                           
काणकोण मतदारसंघाच्या विकासाला चालना देण्यासाठी काणकोण नगरपालिका सभागृहात बोलावण्यात आलेल्या आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंचायत सदस्य, सरकारी अधिकारी व नागरिकांच्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बोलत होते. 

व्यासपीठावर आमदार इजिदोर फर्नांडिस, खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार विजय पै खोत, माजी आमदार सुभाष फळदेसाई, माजीमंत्री प्रकाश वेळीप, नगराध्यक्ष प्रार्थना नाईक गावकर , उपनगराध्यक्ष सुमिता धुरी उपस्थित होत्या.  आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काणकोणात विज्ञान महाविद्यालय उभारण्यास  परवानगी दिल्याबद्दल आभार मानले.  या भागात 22 कोटी रुपये खर्चाची समांतर जलवाहिनी घालण्याची निविदा काढण्यात आली आहे.

पाईप  लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, काणकोणातील सामाजिक आरोग्य केंद्रात सुविधा पुरवणे,  काणकोण अग्निशमन दलासाठी नवीन इमारत, नवीन गाडी देण्याची गरज असल्याने त्या पुरवाव्यात, अशीही मागणी  त्यांनी केली. बैठकीत सरपंच अजय लोलयेकर, गावडोंगरी सरपंच सुमन गावकर, पैगिंण सरपंच रामदास पुजारी, खोतीगाव पंचायत सरपंच दया गावकर, श्रीस्थळ पंचायत सरपंच देवेंद्र नाईक, आगोंद पंचायत सरपंच प्रमोद फळदेसाई, खोल पंचायत सरपंच पूर्णा नायक, काणकोण नगराध्यक्ष प्रार्थना नाईक गावकर यांनी आपल्या क्षेत्रातील समस्या व करायची विकासकामे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापुढे मांडले.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व समस्या लिखित स्वरुपात आपल्याला पाठविण्याचे आदेश उपस्थित अधिकार्‍यांना दिले. काणकोण पालिका निरीक्षक येसो देसाई यांनी आभार मानले.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काणकोण भाजप कायलर्याचे चावडी येथे फीत कापून उद्घाटन केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गुळे येथे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर धवळखाजन-आगोंद, श्रीस्थळ पंचायत कार्यालय,पोटके-पैगिंण,लोलये, गावडोंगरी, खोतीगाव ,तळपण येथे बैठका घेऊन भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विनय तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार विजय पै खोत, भाजपचे सचिव सदानंद शेट तानावडे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.