Thu, Nov 15, 2018 03:13होमपेज › Goa › मांडवी, झुवारी पुलांवरील वाहतुकीचा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून आढावा

मांडवी, झुवारी पुलांवरील वाहतुकीचा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडून आढावा

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 24 2018 12:23AMपणजी : प्रतिनिधी

मांडवी तसेच झुवारी पुलांवरील वाहतुकीच्याव्यवस्थापनाचा आढावा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सचिवालयात शनिवारी पार पडलेल्या  बैठकीत घेतला.

या  आढावा बैठकीला गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे (जीएसआयडीसी) अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी त्याचबरोबर मांडवी तसेच  झुवारीच्या नव्या पुलाचे  कंत्राटदार उपस्थित होते.

मांडवी तसेच झुवारी नदीवरील नव्या पुलांच्या कामामुळे जुन्या मांडवी तसेच झुवारी पुलावर सध्या वाहतुकीचा  ताण वाढत आहे.  वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असून वाहन चालकांना या पुलांवरील रहदारी  डोकेदुखी बनली आहे. विशेषतः सकाळी व संध्याकाळच्यावेळी वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकच भर पडते.  त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन कोलमडले आहे. या बाबीची दखल मुख्यमंत्री पर्रीकर यांनी  घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्‍यांना मांडवी तसेच झुवारी पुलावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य  व्यवस्थापन करण्याची सूचना दिली. त्याचबरोबर   या दोन्ही पुलांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी तसेच वाहतूक सुरळीत  व्हावी यासाठी पावले उचलावीत, असे निर्देशही दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.