Mon, Aug 26, 2019 01:29होमपेज › Goa › पणजी मार्केट अस्वच्छ करणार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर  

पणजी मार्केट अस्वच्छ करणार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ची नजर  

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

आशिया खंडातील एक उत्तम मार्केट अशी ओळख असलेल्या पणजी मार्केटमध्ये  सध्या  अस्वच्छता पसरली असून तो चर्चेचा विषय  बनला आहे. या पार्श्‍वभूमीवर  मार्केटमध्ये पान खाऊन थुंकणार्‍यांवर व अन्य तर्‍हेने अस्वच्छता  पसरवणार्‍यांवर करडी  नजर ठेवण्यासाठी 35 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत, असे पणजी मनपा मार्केट समितीचे अध्यक्ष उदय मडकईकर यांनी सांगितले.

पणजी मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 35 जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत.  गणेश चतुर्थीपर्यंत हे सीसीटीव्ही  बसवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मडकईकर म्हणाले की, पणजी मार्केटची इमारत नेहमीच गजबजलेली असते. मात्र, इमारतीत जागोजागी पान खाऊन थुंकणे,  कचरा टाकणे, नैसर्गिक विधी करणे आदी अस्वच्छतेचे प्रकार होताना दिसून येत आहे. मनपा कामगारांकडून मार्केट इमारत नियमितपणे स्वच्छ केली जाते. मात्र, पुन्हा  लोकांकडून अस्वच्छता पसरवली जाते.   

अस्वच्छतेच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मार्केटमध्ये 35  ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव  मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या प्रस्तावाचा  तांत्रिक विभागाकडून अभ्यास केला जात आहे. मनपा आयुक्‍त लवकरच निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरु करणार आहेत, असेही त्यांनी  सांगितले.

या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा नियंत्रण कक्ष पणजी महानगरपालिका कार्यालयात असेल. तांत्रिक विभागाचे कर्मचारी  हा  नियंत्रण कक्ष   हाताळतील. सीसीटीव्हीत  मार्केटमध्ये अस्वच्छता करणारे टिपले गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधितांना दंड ठोठावण्यात येणार असल्याचेही मडकईकर यांनी सांगितले.