Mon, Mar 18, 2019 19:38होमपेज › Goa › राज्यातील बसेसना आता ‘जीपीएस’ 

राज्यातील बसेसना आता ‘जीपीएस’ 

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 11:33PMपणजी : प्रतिनिधी

वाहतूक विभागाकडून सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अर्थात कदंब महामंडळाच्या आणि खासगी बसेसमध्ये ‘ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम’ (जीपीएस) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वाहतूक खात्याच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या निर्णयामुळे बसच्या प्रतीक्षेत थांबणार्‍या प्रवाशांनाही बसचा नेमका ठावठिकाणा मोबाईलच्या माध्यमातून कळणार आहे.

राज्यात सुमारे 1 हजार 800 खासगी तर 550 कदंब बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. वाहतूक विभागाकडे काही बसेस प्रवासी मिळवण्यासाठी मुद्दामहून वेळकाढू धोरण अवलंबत  असल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही सूत्रांनी सांगितले. 

सर्व  बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीपीएस प्रणालीतून प्राप्त माहितीच्या आधारे  वेळापत्रकाचे पालन न करणार्‍या बस चालकांविरोधात कारवाई केली जाईल, असेही एका अधिकार्‍याने सांगितले. 

जीपीएसच्या मदतीने बस वेळापत्रकानुसार निर्धारित फेरी करत आहे की नाही, किंवा मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे यावर लक्ष ठेवले जाईल. सध्या वाहतूक व्यवस्था ढासळली असून जीपीएस यंत्रणा ही स्थिती सुधारण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

बसस्थानकावर बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी आपल्या मोबाईलवर लॉग इन करून बस नेमकी कुठे पोचली आहे व किती वेळाने आपण आहोत  त्या ठिकाणी पोचेल, याची माहिती मिळवू शकतील, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. 
केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार राज्य सरकारकडून जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली पुरवठा, देखभाल व ते बसवण्यासाठी पात्र कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. जीपीएस यंत्रणा वाहनाचे स्थान मध्यवर्ती सर्व्हरकडे प्रक्षेपित करू शकेल. गोवा हे वाहतूक व्यवस्थेत जीपीएस बसवणारे पहिले राज्य ठरू शकेल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.