Thu, Mar 21, 2019 23:33
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘मोपा ’क्षेत्रातील झाडे तोडण्याला स्थगिती

‘मोपा ’क्षेत्रातील झाडे तोडण्याला स्थगिती

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:31AMपणजी : प्रतिनिधी

मोपा विमानतळ प्रकल्प जागेतील 21 हजार 703 झाडे तोडण्याच्या  वनसंरक्षकांनी दिलेल्या परवानगीला  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. यासंबंधी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर चार आठवड्यांत सुनावणी घ्यावी, असा आदेशदेखील न्यायालयाने   प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिला आहे. ‘फेडरेशन ऑफ रेनबो वॉरियर्स’ या संघटनेकडून यासंबंधी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने  वरील आदेश दिला.

दरम्यान, यासंदर्भात 12 मार्च रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ‘फेडरेशन ऑफ  रेनबो वॉरियर्स’चे सदस्य स्वप्नेश शेर्लेकर यांनी पणजीत   घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, मोपा विमानतळ परिसरात  वन खात्याकडून 21 हजार 703 झाडे तोडण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ वनसंरक्षकाने जारी केला होता.  त्यानुसार 28 फेब्रुवारीपासून ही झाडे कापण्यास सुरुवात झाली. वन खात्याकडून 21 हजार 703 झाडे तोडण्यासाठी परवाना जारी केला असला, तरी प्रत्यक्षात   बेकायदेशीरपणे   याहून अधिक झाडांची त्या ठिकाणी कत्तल करण्यात येत आहे. 

झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने तेथील पर्यावरणाला धोका संभवत आहे. संबंधित परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून वन्यप्राण्यांचा तेथे अधिवास आहे. त्यामुळे झाडांची बेकायदेशीरपणे केल्या जाणार्‍या कत्तल प्रकरणात  असलेल्या लोकांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी शेर्लेकर यांनी केली. संबंधित प्रकरण हे केवळ  झाडांच्या कत्तलीचेच नव्हे, तर ते मोठ्या प्रमाणात लाकूड चोरीचेदेखील आहे, असेही शेर्लेकर म्हणाले.  मोपा विमानतळ प्रकल्प उभारणार्‍या गोवा सरकार, नागरी उड्डाण  खाते, जीएमआर कंपनी, वन खाते तसेच या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणार्‍या अ‍ॅक्सिस बँकेचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचेही शेर्लेकर यांनी यावेळी सांगितले.  यावेळी संघटनेचे सदस्य संदीप कांबळी, मनोज परब  व अन्य उपस्थित होते.