Sun, Jul 21, 2019 12:54होमपेज › Goa › संस्कार हीच गोमंतकाची ओळख

संस्कार हीच गोमंतकाची ओळख

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:36AMपणजी : प्रतिनिधी

आपल्याला प्रेम, विश्वास, श्रद्धा, भाव अशा अमूल्य प्रकारचा ठेवा धर्माच्या माध्यमातून मिळत असतो. जगण्यामध्ये जो आनंद आहे, तो आनंद पैसा देवू शकत नाही. आनंद आपल्याला भाव श्रद्धेद्वारा प्राप्त होत असतो. संस्कार हीच गोमंतकाची खरी ओळख असून गोमंतकाला आज ऋषिमुनींचा वारसा पुढे नेण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले. श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित सांस्कृतिक विभागातर्फे धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या दिव्य अधिष्ठानाखाली श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर ‘सामूहिक उपनयन संस्कार समारंभ’ शनिवार दि. 5 मे झाला. या कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले.

वैदिक शिक्षण पद्धती, संस्कार, संस्कृती, धर्म हे विषय समाजात पुन्हा रुजावे, उपनयन संस्कार करुन गुरुंकडून ज्ञान प्राप्त करता यावे, घरोघरी हा वैदिक संस्कृतीचा वारसा पोहोचावा व संस्कारी जीवन मनुष्याला जगता यावे या उदात्त हेतूने हा उपनयन संस्कार समारंभ तपोभूमीवर आयोजित केला होता.

ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी म्हणाले, की धर्माच्या आचरणाला बळ व प्रोत्साहन देण्यासाठी चार पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांची गरज आहे. आज आपण पाहत आहोत युवक आपले संस्कार, संस्कृती, धर्माचरण टिकविण्यासाठी पुढे येत आहे. फक्त गोमंतकचं नव्हे तर संपूर्ण विश्व संस्कारांचे धडे गिरवताना पाहत आहोत. या उपनयन संस्कारांच्या माध्यमातून गोमंतकाची भावी पीढी संस्कारांकडे आकृष्ट होताना दिसत आहे.

मौजीबंधन सोहळ्यास अ‍ॅड. ब्राह्मीदेवीजी, दिगंबर कालापूरकर, नारायण नाईक, सुवर्णा सातार्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मौजीबंधन संस्काराचा लाभ  हर्ष  पाटकर, असोळणा, वंश प्रभूगावकर-खांडेपार,  बाळकृष्ण चव्हाण -खानापूर,  ॠत्विक भामईकर-ओपाखांडेपार, हर्ष भामईकर-फोंडा, वेदांत  नाईक-सावर्डे, ओंकार नाईक-सांगोल्डा,  अभिजित  पाटील-खानापूर,  लोकेश गुरुदास गावस-दांडेली,  अमोघ नाईक-अमळाय पंचवाडी, मंदार  नाईक, दिव्यांग आदींनी घेतला. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.