Fri, Apr 26, 2019 16:00होमपेज › Goa › प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

Published On: Feb 26 2018 12:42AM | Last Updated: Feb 26 2018 12:00AMम्हापसा ः प्रतिनिधी

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  राहणार्‍या दुर्गेश महंतो (वय 36) या नेपाळी युवकाने त्याची प्रेयसी लेखी छेत्री (34, मूळ रा. आसाम) हिचा तोंडावर उशी दाबून खून करून स्वतःओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.25) हणजूण येथे घडली. 

दुर्गेश व लेखी राहत असलेल्या खोलीच्या घरमालकाने रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत खोलीचे दार उघडले नसल्याचे पाहून दोघांना हाक मारली. मात्र, आतून प्रतिसाद न आल्याने दरवाजाच्या फटीतून पाहिले असता लेखी पलंगावर पडलेली आणि दुर्गेश पंख्याला लटकत  असल्याचे दिसून आले. हे पाहताच घरमालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी सहकार्‍यांसमवेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दुर्गेश महंतो व लेखी यांनी चार महिन्यांपूर्वी हणजूण येथे भाडोत्री खोली घेऊन संसार थाटला होता. लेखी एका स्पामध्ये नोकरी करत होती. तर दुर्गेश नोकरीच्या शोधात होता. तो लेखीकडे वारंवार पैसे मागायचा. त्यातून त्यांच्यात अधूनमधून खटके उडायचे.  शनिवारी (दि.24) त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. दोघांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्या, मात्र नंतर सामोपचाराने भांडण मिटवले. संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास   लेखी घरी आली व दुर्गेशबरोबर फिरायला गेली. रात्री घरी परतल्यावर जेवण आटोपल्यानंतर दुर्गेशने लेखी झोपलेली असताना उशीने तिचे तोंड दाबले. यातच तिचा मृत्यू झाला. दुर्गेशने नंतर तिचीच ओढणी पंख्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.