Wed, Sep 26, 2018 10:10होमपेज › Goa › सिंधुदुर्गः तिलारी घाटाच्या दरीत दोघांचे मृतदेह

सिंधुदुर्गः तिलारी घाटाच्या दरीत दोघांचे मृतदेह

Published On: Jan 06 2018 1:50AM | Last Updated: Jan 06 2018 1:50AM

बुकमार्क करा
दोडामार्ग : वार्ताहर

आंबोली घाटापाठोपाठ आता  तिलारी घाटात शुक्रवारी दोन तरुणांचे  मृतदेह सापडले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. चंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए. बी. पवार यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्धवट सडलेले मृतदेह   शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. एकाच ठिकाणी दोन तरुणांचे मृतदेह सापडल्याने चंदगड पोलिसांसमोर तपास करणे मोठे आव्हान आहे.

तिलारी घाट गेल्या महिनाभरापासून दुरुस्तीसाठी  वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चंदगड सा. बां. विभागाकडून या घाटाचे काम सुरू आहे. या डांबरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी मोर्ले गावचे माजी  सरपंच गोपाळ गवस व मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो व अन्य काही जण गुरुवारी तिलारी घाटात गेले असता त्यांना दरीतून कुजलेला वास आला. त्यांनी नेमका वास कशाचा व कोठून येतो, याचा शोध घेण्यासाठी काही अंतर खाली उतरून पाहणी केली असता त्यांना त्या ठिकाणी अर्धवट कुजलेल्या स्थितीत मृतदेह असल्याचे आढळून आले. साधारण 100 फूट खाली दरीत मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याची शंका वर्तवण्यात आली. तसेच रक्त लागलेला एक दगडही बाजूस सापडला. यामुळे घातपाताची शंका व्यक्त होत आहे.  ही माहिती लगेच चंदगड पोलिसांना दिल्यावर  पोलिस घटनास्थळी  दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी  चंदगड येथे पाठवला. शुक्रवारी सकाळी पोलिस घटनास्थळी पुन्हा तपास  करीत असताना काही अंतरावर दुसरा मृतदेह दिसून आला. तो ही पुरुषाचा असल्याचे स्पष्ट झाले.