Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Goa › बेतोडा भागात गव्यांकडून भातशेतीची हानी, शेतकरी त्रस्त

बेतोडा भागात गव्यांकडून भातशेतीची हानी, शेतकरी त्रस्त

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:20PM

बुकमार्क करा
फोंडा : प्रतिनिधी

आशेवाडा-बेतोडा येथे गेल्या 10-12 दिवसांपासून गव्यांनी भातशेतीत घुसून पिकाची नासधूस करण्यास  सुरूवात केली आहे. गव्यांच्या उपद्रवामुळे 35-40 शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्रस्त शेतकर्‍यांनी कृषी खाते आणि वनखात्याला निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आशेवाडा गावात चाफाळवाडा, गाळवाडा भागातील शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून भातशेती करीत आहेत. परंतु गेल्या 10-12 दिवसांपासून गव्यांनी शेतीची हानी केल्याने शेतकर्‍यांची झोप उडाली आहे, असे लक्ष्मण गावकर या शेतकर्‍याने सांगितले. ते म्हणाले,  सायंकाळी 5 वाजल्यानंतर गवे शेतात  कळपाने प्रवेशतात. गव्यांना पिटाळण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी  केला तरी  ते जात नसल्याने डोळ्यादेखत हाताशी आलेल्या पिकाची हानी शेतकर्‍यांना पहावी लागत आहे. 

गावकर म्हणाले, काहींची शेतातच घरे असल्याने  त्या शेतकर्‍यांमध्ये गव्यांच्या  उपद्रवामुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. गव्यांच्या उपद्रवामुळे होणार्‍या नुकसानीची दखल घेऊन सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी आणि वन खात्याकडे केली आहे. गतवर्षी शिवडे-धारबांदोडा येथे गव्याच्या हल्ल्यात एका बागायतदाराचा मृत्यू झाला होता.

रोहीदास गावकर यांनी सांगितले, की गव्यांच्या उपद्रवामुळे शेती सोडण्याची वेळ आम्हा शेतकर्‍यांवर आली आहे. राज्य सरकारने वेळीच या रानटी पशूंचा बंदोबस्त करावा आणि शेती वाचवावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.