होमपेज › Goa › फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवा 

फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरण सीबीआयकडे सोपवा 

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:56PMपणजी : प्रतिनिधी

फादर बिस्मार्क डायस यांचा मृतदेह पुन्हा शवचिकित्सा करण्यास अयोग्य असल्याचा डॉक्टरांचा अहवाल प्राप्त झाला आहे. पुरावे नष्ट झाल्याने फा. बिस्मार्क यांच्या मृत्यूचे कारण निश्चित करण्यात पोलिस अपयशी ठरल्याने सदर तपासकाम सीबीआयकडे द्यावे, अशी मागणी  फादर बिस्मार्क यांचे बंधू मारियो डायस यांनी येथे  पत्रकार परिषदेत केली.ते म्हणाले की, गेली दोन वर्षे फा. बिस्मार्क यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे. दोन वेळा बिस्मार्क यांच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात येऊनही पोलिसांकडून अजूनही मृत्यू कोणत्या कारणाने झाला ते स्पष्ट करण्यात आलेले नाही. आपण स्वत: आपल्या बंधूचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली होती.

मात्र, तेथे असलेल्या पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याने त्यांचा मृतदेह गोमेकॉत नेण्याची व्यवस्थाही आपल्याला करावी लागली होती. फा. बिस्मार्क यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा चेहरा शांत व डावा हात छातीवर तर उजवा हात वर उगारलेल्या स्थितीत होता. त्यांचे पाय एकमेकांवर सरळ ठेवण्यात आले होते, बुडणार्‍या माणसाच्या देहाची अशी अवस्था होऊ शकत नाही. फा. बिस्मार्क यांच्या उजव्या डोळ्याच्यावर जखम झालेली असून कोणीतरी जड वस्तूचा घाव केल्याने ती जखम झालेली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील पुराव्याची आणि दोन साक्षीदारांची सखोल तपासणी केली नसल्याने बुडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी जाहीर केले. फा. बिस्मार्क यांचा मृत्यू अपघाताने नव्हे तर घातपाताने झाला असल्याचा आपला आरोप असून क्राईम ब्रँचला तपास करण्यात अपयश आले आहे.

यासाठी आपल्यासकट सर्व गावकर्‍यांच्यावतीने फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करत आहे. प्रख्यात गायिका हेमा सरदेसाई यांनी फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरणी बंधू मारियो डायस  व गावकर्‍यांना पाठिंबा व्यक्त केला. फा. बिस्मार्क यांच्या मोबाईलवरील संभाषणाची तसेच पुराव्याची नव्याने तपासणी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच फा. बिस्मार्क यांच्या मृत्यूच्या वेळी बरोबर असलेल्या दोघा युवा साक्षीदारांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी करण्याची मागणीही सरदेसाई यांनी  केली. 

Tags : Goa, Bismarck, death, case, handover,  CBI