Wed, Jan 22, 2020 01:05होमपेज › Goa › पर्यटन क्षेत्रात गोव्याच्या स्थानात घसरण 

पर्यटन क्षेत्रात गोव्याच्या स्थानात घसरण 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सादर केलेल्या 2016सालच्या देशी  पर्यटकांच्या सांख्यिकी अहवालात  देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत गोव्याचे नाव नसल्याचे जाहीर केले आहे. विदेशी पर्यटकांच्या आकडेवारीतही गोवा नवव्या क्रमांकावर पोहचला असल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

‘पर्यटकांचा स्वर्ग’ अशी गोवा पर्यटन खात्याकडून स्वत:ची जाहिरात देश- विदेशात केली जाते.  याआधी एका खासगी एजन्सीने केलेल्या सर्व्हेक्षणात पर्यटन क्षेत्रातील पहिल्या पाच राज्यात  गोव्याला तिसरा क्रमांक दिला गेला  होता. मात्र केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालात खासगी सर्वेक्षणाच्या विपरित धक्कादायक आकडेवारी दिली आहे.

अहवालातील पर्यटकांच्या आकडेवारीनुसार, 2016 साली  तामिळनाडू राज्याचा पर्यटन क्षेत्रात अग्रक्रमांक लागला असून एकूण 34.38 कोटी पर्यटकांनी या राज्याला भेट दिली आहे. तर दहाव्या क्रमांकावर असलेल्या राजस्थानला 4.14 कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. या गटात गोव्याचा उल्लेख ‘अन्य राज्या’मध्ये करण्यात आला आहे.

विदेशी पर्यटकांच्या गटातही गोवा नवव्या क्रमांकावर असून 2016 साली 6.80 लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याचे हा अहवाल म्हणतो. देशातील एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 2.8 टक्के आहे. या गटात पुन्हा एकदा तामिळनाडूच पहिल्या क्रमांकावर असून दुस-या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. एकूण टक्केवारीत तामिळनाडूला 19.1 टक्के तर महाराष्ट्राला 18.9 टक्के विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. या दोन्ही राज्याच्या  पाठोपाठ उत्तरप्रदेश, दिल्ली, पं. बंगाल, राजस्थान, केरळ, बिहार असा क्रम असून दहाव्या क्रमांकावर पंजाबची वर्णी लागते.

विदेशी आंतरराष्ट्रीय चेक पोस्ट (विमानतळ) या गटातही गोव्याचा 9 वा क्रमांक आहे. 2016 साली एकूण 2.79 लाख पर्यटकांची येथे नोंद झालेली असून  एकूण टक्केवारीत हे प्रमाण केवळ 3.17 टक्के आहे. ई-व्हिसा घेऊन आलेल्या पर्यटकांच्या गटात गोव्यातील प्रमाण काही प्रमाणात चांगले आहे. मागच्या वर्षी (2016)दाबोळी विमानतळावर 1.03 लाख पर्यटकांनी ई-व्हिसासह भेट दिली असून या गटात गोव्याला तिसरे स्थान प्राप्त झाले आहे. यातील एकूण टक्केवारी 9.6 टक्के इतकी आहे. 

केरळच्या तुलनेत गोवा मागे  

केरळातील 392 तारांकित हॉटेलात 31 डिसेंबरपर्यंत 11,114 खोल्यांची नोंद झाली आहे. त्या तुलनेत गोव्यातील 44 तारांकित हॉटेलात केवळ 4317 खोल्या असल्याचे या अहवालात म्हटले आहे.