Fri, Aug 23, 2019 22:10होमपेज › Goa › गोमांस अल्प पुरवठा : पणजी, म्हापशातच विक्री 

गोमांस अल्प पुरवठा : पणजी, म्हापशातच विक्री 

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:31PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोमांस विक्रेत्यांनी  पुकारलेला बंद मागे घेतल्याने बुधवारपासून (10 रोजी) राज्यात गोमांस पुरवठा पुन्हा सुरू झाला. मात्र  गोमांसाचा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने केवळ  पणजी  व म्हापसा येथील दुकानांमध्ये ते उपलब्ध केल्याची माहिती कुरेशी मांस विक्रेते संघटनेचे सरचिटणीस अन्वर बेपारी यांनी सांगितले.  राज्यात दरदिवशी 20 ते 25 टन गोमांसाची आवश्यकता भासते. मात्र   बुधवारी केवळ अडीच टन गोमांसाचा  पुरवठा झाला. गुरुवारपासून गोमांसाचा पुरवठा सुरळीत होईल, असेही त्यांनी सांगितले.

परराज्यातून (कर्नाटक)  गोव्यात होणारी  गोमांसाची वाहतूक बेकायदेशीर असल्याचे  म्हणत प्राणिमित्र स्वयंसेवी संघटना व पोलिसांकडून यासंदर्भात केल्या जाणार्‍या कारवाई विरोधात गोमांस विक्रेत्यांनी  चार दिवसांपूर्वी बंद पुकारला होता. सरकारच्या आश्‍वासनानंतर  हा बंद मागे घेऊन बुधवारपासून  बाजारात गोमांस उपलब्ध होईल, असे सांगितले होते. मात्र, कर्नाटकातून गरजेेपेक्षा फारच कमी प्रमाणात गोमांसाचा पुरवठा  झाल्याने   केवळ पणजी व म्हापसा येथील दुकानांवरच ते उपलब्ध झाले.

बेपारी म्हणाले, 200 रुपये प्रती किलो या दराने गोमांसाची विक्री  केली जाते. कर्नाटकातून  गोव्यात गुरूवारपासून (आज) गोमांसाचा पुरवठा  सुरळीत  होईल. कायदेशीरीत्या गोमांस आयातीला अडथळा येऊ देणार नाही. पोलिस राज्यातील सर्व सीमांवर उभे राहून गोमांस आयातची कायदेशीर कागदपत्रे तपासतील. जर सर्व परवाने व खरेदीचे पुरावे व्यवस्थित असतील तर गोमांस आयातीला कोणताही अडसर असणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांनी गोमांस अडवले नाही : चर्चिल 

गोमांस हा ख्रिश्‍चनांच्या भोजनातील प्रमुख पदार्थ आहे. अनेक हिंदूही आवडीने गोमांस खातात, त्यांची नावे आपणास उघड करायला लावू नयेत. मात्र मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोमांस अडवले नाही, याचा आपल्याला विश्‍वास आहे, असे चर्चिल आलेमाव यांनी  सांगितले. चर्चिल म्हणाले, या प्रकरणात जे कोणी गुंतले आहेत त्यांची चौकशी व्हावी. विकण्यासाठी आणलेले बैल पोलिस  घेऊन जात आहेत. आपण अनेकवेळा अशी गुरे सोडवलेली आहेत. वेस्टर्न बायपास विषयी ते म्हणाले, की वेस्टर्न बायपासचा आराखडा दाखवल्याशिवाय  काम सुरू करणार नसल्याची हमी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली आहे. स्वयंसेवी संघटनांनी विनाकारण विकासकामांना  विरोध करू नये.