होमपेज › Goa › सांतिनेझ ख्रिश्‍चन, हिंदू स्मशानभूमीचे लवकरच सौंदर्यीकरण

सांतिनेझ ख्रिश्‍चन, हिंदू स्मशानभूमीचे लवकरच सौंदर्यीकरण

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 09 2018 1:27AMपणजी : प्रतिनिधी

सांतिनेझ पणजी येथील हिंदू स्मशानभूमी, ख्रिश्‍चन दफनभूमी, मुस्लिम कब्रस्थान,  खोजा व लिंगायत यांच्या दफनभूमींची पुनर्बांधणी व सौंदर्यीकरण पणजी मनपाकडून लवकरच हाती घेतले जाणार आहे, अशी  माहिती महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिली.

गोवा राज्य शहर विकास प्राधिकरण (जीसुडा)कडून ही सर्व कामे हाती घेतली जाणार आहेत.  येत्या काही दिवसांत या संदर्भातील निविदा प्रक्रिया हाती घेतल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फुर्तादो म्हणाले, की सांतिनेझ पणजी येथील हिंदू स्मशानभूमी,  ख्रिश्‍चन, खोजा व लिंगायत दफनभूमी, मुस्लिम कब्रस्थान यांच्या दफनभूमींची पुनर्बांधणी व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सर्व कामांसाठीच्या  निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्या की ऑक्टोबर महिन्यापासून कामास सुरवात केली जाईल. सांतिनेझ येथे असलेल्या   अ‍ॅनिमल शेल्टरनजीक लहान पार्क उभारले जाणार आहे. त्याचबरोबर  भटक्या जनावरांसाठी लहानशी ओपीडीही उभारली जाणार आहे. या ओपीडीत त्यांच्यावर ऑपरेशन केल्यानंतर त्यांना मनपाकडून कुडका- मेरशी येथे 1 हजार 500 चौरस मीटर जागेत उभारण्यात येणार्‍या अ‍ॅनिमल शेल्टर हॉलमध्ये हलवण्यात येईल. 

हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्थान, खोजा व लिंगायत यांच्या दफनभूमींची पुनर्बांधणी, सौंदर्यीकरण  व पार्कच्या कामासाठी 9 कोटी 71 लाख 73 हजार 150 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. ख्रिश्‍चन  दफनभूमीच्या कामावर 5 कोटी 20 लाख 90 हजार 585 रुपये  तर कुडका मेरशी येथील अ‍ॅनिमल शेल्टर प्रकल्प उभारणीवर 1 कोटी 55 लाख 7 हजार  930 रुपये इतका खर्च होण्याचा अंदाज असल्याचेही फुर्तादो यांनी सांगितले.