Tue, Jan 22, 2019 02:13होमपेज › Goa › मिरामार किनार्‍याचे दोन वर्षांत सौंदर्यीकरण

मिरामार किनार्‍याचे दोन वर्षांत सौंदर्यीकरण

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी

मिरामार किनार्‍याचे 9.28 कोटी रुपये खर्च करून येत्या दोन वर्षांत सौंदर्यीकरण करण्यात येणार असून या प्रसिद्ध किनार्‍याचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.जागतिक बँकेकडून दिल्या जाणार्‍या निधीतून एकात्मिक किनारीक्षेत्र  व्यवस्थापन प्रकल्पा अंतर्गत  हे काम हाती घेतले जाणार आहे. या संदर्भातील निविदा पर्यावरण व वन मंत्रालयाच्या  एकात्मिक किनारीक्षेत्र  व्यवस्थापन सोसायटी (एसआयसीओएम) कडून जारी करण्यात आली आहे.मिरामार किनार्‍याच्या सौंदर्यीकरण प्रकल्पा अंतर्गत तेथील पायाभूत सुविधांचा विकास करणे,  प्रदूषणमुक्‍त सेवा पुरवणे, किनारी सुरक्षा देखरेख सुविधा आदी तयार केल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या सौंदर्यीकरण प्रकल्पावर 9.28 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी  4.53 कोटी रुपये   पायाभूत सुविधा, बायो टॉयलेट उभारण्यावर खर्च केले जातील. 3.28 कोटी रुपये प्रदूषणमुक्‍त सेवा तर 1.46 कोटी रुपये हे किनारी सुरक्षा, देखरेख सुविधा  यांच्यावर खर्च केले जाणार आहेत. याच सौंदर्यीकरण प्रकल्पाचा भाग म्हणून किनार्‍याचे प्रवेशद्वार हे मिरामार येथील  सायन्स सेंटर समोर उभारण्यात येईल. याशिवाय  बांबूपासून बनवण्यात आलेला वॉकवे देखील उभारण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बँकेच्या निधीतून देशातील  विविध किनार्‍यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा तयार केल्या जाणार आहे. मिरामार किनार्‍याची या प्रकल्पासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.