Sun, May 26, 2019 08:42होमपेज › Goa › बसुराजच्या मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटातून हस्तगत

बसुराजच्या मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटातून हस्तगत

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:34AMमडगाव : प्रतिनिधी

कुडचडेत गाजत असलेल्या बसुराज बाकडी (38)याच्या खून प्रकरणात त्याची पत्नी कल्पना बाकडी हिने  बुधवारी कुडचडे पोलिसांना अनमोड घाटात फेकून दिलेल्या   पतीच्या मृतदेहांचे अवशेष दाखवले. गोवा कर्नाटक सीमेजवळ दोन ठिकाणावरून पोलिसांनी बाकडी याचे डोके , हात आणि कुजलेल्या अवस्थेतील छातीचा भाग शोधून काढला.खुनाचा हा प्रकार उघडकीला येऊ नये,यासाठी मारेकर्‍यांनी मेलेल्या कोंबड्या आणि बोकड टाकण्यात आलेल्या जागेची निवड केली होती.

बसुराज बाकडी यांचा दि.2 एप्रिल रोजी खून करून अब्दुल शेख,सुरेश कुमार,पंकज पवार आणि  अन्य एका फरारी संशयिताच्या मदतीने कल्पना हिने मृतदेहाचे तीन तुकडे केले होते. मृतदेहाचे तीन भाग विविध पिशव्यांत भरून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी एका जीपमध्ये घालून तो मडगाव येथे नेला होता. पण मडगावात मृतदेह टाकणे शक्य न झाल्याने त्यांनी मोले गाठले.तिथून मध्यरात्रीच्या सुमारास ते मोले चेकपोस्ट ओलांडून अनमोड घाटात नेले.कर्नाटक सीमेवर मुख्य रस्त्यालगतच्या दरीत त्यांनी हात आणि शीर असलेली पिशवी फेकून दिली.दूधसागर मंदिरापासून सुमारे 4 किमी  अंतरावर त्यांनी छातीचा भाग असलेली पिशवी फेकून दिली,2 किमी अंतरावर सुमारे 20 मीटर खोल दरीत पाय असलेली पिशवी टाकून दिली होती.या जागा संशयित कल्पनाने कुडचडे पोलिसांना दाखवल्या.

कर्नाटकमार्गे गोव्यात आणताना  मृत्युमुखी पडणार्‍या बॉयलर कोंबड्या टाकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या जागेची निवड मृतदेहाचे तुकडे टाकण्यासाठी  मारेकर्‍यांनी केली होती.कुजक्या कोंबड्या आणि बकर्‍यांचे मांस पिशवीत भरून या ठिकाणी टाकले जात होते.खुनाचा प्रकार लपवण्यासाठी मृतदेहाचे हात डोके आणि छाती या ठिकाणी टाकण्यात आली होती.त्यातून मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लागली. बहुतांश प्लास्टिकच्या पिशव्यात कोंबड्यांचे कुजके मांस आढळून आले.पोलिसांनी कल्पनाला सदर ठिकाणी नेऊन चौकशी केल्यानंतर एका तांदळाच्या पिशवीत छातीचा भाग अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.