Mon, Jun 24, 2019 20:56होमपेज › Goa › खनिज उत्खननावर १३ पासून बंदी

खनिज उत्खननावर १३ पासून बंदी

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 07 2018 12:05AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील 88 खाणींचे लीज रद्द करून येत्या 15 मार्च 2018 पासून उत्खनन बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी  खाण खात्याने पावले उचलली असून राज्यातील लोह खनिज उत्खनन मंगळवार दि.13 मार्चपासून बंद करावे,  14 मार्चपासून खनिज वाहतूक बंद करावी आणि   खाणींवरील सर्व यंत्रणा  15 मार्च रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत हलवावी, असा आदेश मंगळवारी जारी केला आहे. परंतु, रॉयल्टी भरणा केलेल्या स्टॉकयार्ड, जेटी, प्रक्रिया प्रकल्पावरील खनिजमालाची वाहतूक 14 मार्चनंतरही सुरू राहू शकते,असेही आदेशात म्हटले आहे.  

खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी खात्याचे सर्व उपसंचालक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तात्काळ व कडक अंमलबजावणीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर खात्याने ही पावले उचलली असल्याचे आचार्य यांनी सांगितले. 

राज्यभरातील खनिज उत्खनन 13 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत  बंद करावे लागेल. खनिजमालाची वाहतूक 14 रोजी सायंकाळी 6 वाजता बंद करावी लागेल. रॉयल्टी भरलेल्या मालाचीच ‘स्टॉकयार्ड’ किंवा जेटीवरून वाहतूक केली जाऊ शकते. खाणींवरील मशिनरी 15 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत न हलविल्यास केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाच्या बंगळुरु कार्यालयातील अधिकारी अथवा विभागीय खाण नियंत्रक यांना पुढील निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार दिला जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

राज्यातील दुसर्‍यांदा नूतनीकरण होऊन कार्यरत असलेल्या खाणींच्या आणि बंद पडलेल्या लीजांची घटनास्थळी जाऊन तपासणी करण्यासाठी खात्यातर्फे चार पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. खात्याने या आदेशाची पूर्वतयारी करण्यासाठी मंगळवारपासूनच काही खाणींवर प्राथमिक चाचणीही केली. खाणींच्या ठिकाणी असलेला खनिजमाल नव्याने उत्खनन करुन काढलेला आहे, की ई- लिलांवाचा अथवा जुना ‘डंप’ आहे याचा तपशीलही अधिकारी नोंदवून घेणार आहेत. या खनिजमालाची छायाचित्रे घेतली जाणार आहेत. सर्व खाण लीजधारकांनी खाणींच्या ठिकाणी  फलकावर तेथील माल नव्याने केलेल्या उत्खननातील आहे, ई-लिलांवाचा आहे, की टाकाऊ ‘डंप’ याबाबतचा स्पष्टपणे उल्लेख करणे आवश्यक आहे. खाण अधिकारी राज्यभरात फिरून येत्या 10 मार्च पर्यंत तपासणीची ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.  

राज्यातील सर्व खाण लिजांची तपासणी खाण खात्याचे तांत्रिकी विभागाचे अधिकारी स्वतंत्रपणे किंवा ‘इंडियन ब्युरो ऑफ माइन्स’, खाण सुरक्षा संचालनालय, वन खाते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी यांच्याबरोबर 15 मार्च रोजी दुपारी 1 नंतर संयुक्तपणे करणार आहेत, असे संचालक आचार्य यांनी सांगितले.