Sat, May 30, 2020 04:21होमपेज › Goa › लहान दुकाने, आस्थापनांना ‘फायर एस्टिंग्विशर’ची अट मागे

लहान दुकाने, आस्थापनांना ‘फायर एस्टिंग्विशर’ची अट मागे

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 11:55PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील 50 चौरस मीटरहून कमी क्षेत्रफळात असलेल्या लहान दुकाने, आस्थापनांना, तात्पुरत्या बांधकामांना आणि किनार्‍यांवरील शॅक्समध्ये ‘फायर एस्टिंग्विशर’ बसवण्याची अट राज्य सरकारने गुरुवारी  मागे घेतली. 

गृहखात्याने याआधी 17 मे 2018 रोजी काढलेल्या अधिसूचनेत, राज्यातील सर्व  दुकाने, आस्थापने, गेस्ट हॉऊस, शॅक्स आदी ठिकाणांत कुठेही नेता येणारा असा ‘फायर एस्टिंग्विशर’ बसवण्याची सक्‍ती केली होती. ही अट न पाळली गेल्यास सदर आस्थापनांचे परवाने नूतनीकृत करू नयेत, असे  सांगितले होते. या अटीमुळे अनेक लहान दुकानदार व व्यापार्‍यांना नाहक खर्च सोसावा लागत होता. 

याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्तक्षेपाने गुरुवारी गृहखात्यातर्फे नव्याने जारी केलेल्या अधिसूचनेत ही अट शिथिल करण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. गृहखात्याचे अवर सचिव नितल आमोणकर यांनी काढलेल्या आदेशात,  50 चौरस मीटर्सहून कमी  क्षेत्रफळ असलेल्या लहान दुकाने, आस्थापने आणि किनार्‍यावरील शॅक्समध्ये ‘फायर एस्टिंग्विशर’ बसवण्याची अट मागे घेण्यात आली आहे. मात्र, गेस्ट हाऊस आणि तात्पुरत्या बांधकामांना ही अट कायम ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, पणजी हॉटेल आणि व्यापारी संघटनेने सरकारच्या फायर एस्टिंग्विशर बसवण्याच्या अधिसूचनेला तीव्र हरकत घेऊन मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्यात परतल्यावर याविषयी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष बर्नाबे सापेको यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे आभार मानले आहेत.