Mon, Feb 18, 2019 13:35होमपेज › Goa › बाबू कवळेकरांचा जामीन अर्ज तांत्रिक कारणाने रद्द

बाबू कवळेकरांचा जामीन अर्ज तांत्रिक कारणाने रद्द

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:15AMमडगाव : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयीन कक्षेच्या तांत्रिक कारणावरून गुरुवारी रद्द करण्यात आला. कवळेकर यांचा अंतरिम जामीन 8 मार्चपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने दिला.  

जिल्हा सत्र न्यायालयाने यापूर्वी कवळेकर यांना 8 फेब्रुवारी रोजी अंतरिम जामीन मंजूर केला होता. या खटल्यासंबंधी न्यायालयीन कक्षेच्या कारणावरून खास सरकारी वकील जे. डी. कीर्तनी यांनी हा खटला दक्षिण गोव्याच्या न्यायालयात चालविण्याला हरकत घेतली होती. सरकार पक्षाने त्यासंबंधीचा अर्जही न्यायालयात दाखल केला होता. 

कवळेकर यांच्याविरोधात पणजी येथे गुन्हा नोंद झाला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग पणजीत आहे. कवळेकर हे ईडीसीचे अध्यक्ष होते; हेही कार्यालय पणजीत आहे. सर्च वॉरंटबद्दलही तपास यंत्रणेने तेथील न्यायालयात अर्ज केला होता. सबब या खटल्याची सुनावणी उत्तर गोवा न्यायालयात व्हावी, अशी मागणी खास सरकारी वकील जे. डी. कीर्तनी यांनी मागच्या सुनावणीच्या वेळी केली होती.