होमपेज › Goa › राज्यात बीएसएनएलचे ४० टॉवर होणार

राज्यात बीएसएनएलचे ४० टॉवर होणार

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 10:58PMकाकोडा : वार्ताहर

राज्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलची सेवा सध्या म्हणावी तशी मिळत नाही. पूर्वीप्रमाणे ही सेवा ग्राहकांना मिळावी यासाठी राज्यातील ग्रामीण  भागात 40 बीएसएनएल मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी दिली. 

वाडे कुर्डी वसाहत क्रमांक 9 मध्ये केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत  उभारण्यात येणार्‍या बीएसएनएल मोबाईल टॉवरची पायाभरणी अ‍ॅड. सावईकर यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी सावईकर बोलत होते.

खासदार विनय तेंडुलकर, आमदार प्रसाद गावकर, सरपंच संजोग पै, उपसरपंच कृष्णा गावकर, पंचायत सदस्य जुझोलिना फर्नांडीस, जानू झोरे, संयोगिता गावकर, बीएसएनएलचे योगेश मिश्रा, नेत्रावळीचे उपसरपंच अभिजीत देसाई उपस्थित होते. 

अ‍ॅड. सावईकर म्हणाले, की बीएसएनलची ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी म्हणून मोबाईल टॉवर उभारले जात आहेत. यामुळे इंटरनेट सेवेला  देखील चांगली गती मिळणार आहे. यापूर्वी कंपनीने अनेक अडचणीवर मात करुन इतर कंपन्यांपेक्षा चांगली सेवा  दिली आहे. 

खासदार तेंडुलकर म्हणाले, की काही कंपन्या आपला फायदा बघून काम करतात. मात्र बीएसएनएल कंपनी लोकांच्या सेवेसाठी कार्यरत आहे. सांगेतील विकास कामांसाठी खासदार निधी उपलब्ध करुन दिला जाईल.   विकास कामे करत असताना लोकांनी विनाकारण  विरोध करु नये.

प्रसाद गावकर म्हणाले, की नेत्रावळी भागात बीएसएनएलचा टॉवर आहे, मात्र त्याची सेवा बोंड, बालशे, विंचुद्रे, कुर्पे भागा पुरतीच   मिळते,  इतर भागातील लोकांची गैरसोय होते. कुर्टीत   मोबाईल टॉवर उभारला जाणार असल्याने ग्राहकांना चांगली सेवा मिळणार आहे. तसेच इंटरनेट सेवा देखील चांगली मिळेल.