Tue, Jul 14, 2020 09:43होमपेज › Goa › काँग्रेसचे १० आमदार होते भाजप प्रवेशासाठी सज्ज

काँग्रेसचे १० आमदार होते भाजप प्रवेशासाठी सज्ज

Published On: Jun 13 2019 1:32AM | Last Updated: Jun 13 2019 1:32AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास सज्ज झाला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी या विलीनीकरणाला मान्यता  न दिल्याने  आम्ही या आमदारांना पक्षप्रवेशास नकार दिला, अशी खळबळजनक माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

तेंडुलकर म्हणाले, की गेल्या पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही व भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठल्याच आमदारावर अथवा स्वत:च्या पक्षावरही नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर झाले आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे की,  गोव्यासह देशभरात पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला राज्य सरकार स्थिर ठेवायचे आहे. पण त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. 

काँग्रेसचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफासियो डायस भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या बाता करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही. पण आम्ही पक्षात कुणालाही घेऊ इच्छीत नाही. कारण आम्हाला कोणताच पक्ष आता अस्थिर करायचा नाही.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपने कोट्यवधी रुपये आमदारांना देऊ केल्याचा  आरोप केला होता. त्याबाबत चोडणकर यांच्याकडे रेकॉडिर्ंंगचा पुरावा असल्याचे चोडणकर यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर बोलताना तेंडुलकर म्हणाले, की चोडणकर भलतेसलते आरोप करत असून पैशांचे आणि पदाचे आमिष दाखवण्याची काँग्रेसला सवय असेल भाजपला नाही. चोडणकर यांनी  याविषयी रेकॉर्डिग असल्यास ते जरूर जाहीर करावे. रेकॉर्डिगमधील आवाज कुणाचा ते तरी लोकांना कळून येईल. ज्यावेळी सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले तेव्हा एकाही पैशांचा व्यवहार झाला नसल्याचे आपण ठामपणे सांगू शकतो. कुठल्याच भाजप नेत्याने अथवा पदाधिकार्‍याने काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. त्यांना आम्ही आमच्या पक्षातही बोलवलेले नाही. कारण भाजपच्या आघाडी सरकारकडे मित्रपक्ष व अपक्ष आमदारांसह एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ असून तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी पुरेसे आहे. 

पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर व सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.