Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Goa › मन की, नाही दिल की बात बोलावी : शत्रुघ्न सिन्हा

‘मन की, नाही दिल की बात बोलावी’

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 10 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

भाजपात  राहून आपण नेत्यांना पक्षाचे खरे स्वरूप दाखवणारा ‘आरसा’ बनलो आहोत.  व्यक्‍ती, पक्ष यापेक्षाही आपण देशहिताला महत्त्व देत असून देशहिताआड कोणीही  आल्यास त्याला ‘खामोश’ करण्यास आपण  भीत नसल्याचे प्रतिपादन भाजपचे खासदार शत्रूघ्न सिन्हा यांनी केले. माणसाने नेहमी ‘मन की बात’ नाही, तर ‘दिल की बात’ स्पष्टपणे मांडण्यास शिकले पाहिजे,असेही ते म्हणाले.

‘लोकशाहीसाठी नागरिक’  या स्वयंसेवी संस्थेतर्फे दोनापावला येथील ‘गोवा इंटरनॅशनल सेंटर’मध्ये आयोजित  ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावरील  परिसंवादात ते बोलत होते. 

सिन्हा म्हणाले, आपण केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होऊन आरोग्य आणि जहाजबांधणीसारखी  मंत्रालये सांभाळली आहेत. मात्र, कधीही आपल्या चारित्र्यावर डाग पडला नाही अथवा भ्रष्टाचाराचा आपल्यावर आरोप झाला नाही. आपण मंत्री नाही, तर जनतेचा ‘संत्री’ बनून राजकारण केले आहे. 

देशात नोटाबंदी, ‘जीएसटी’ लागू केल्याने चांगले झाले की वाईट झाले, यावर चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही गोष्टी लागू झाल्यानंतर अनेक लहानसहान व्यापारी, उद्योजक, शेतकरी अडचणीत आले आहेत.नियमित  रोजीरोटी बंद पडल्याने हा वर्ग चिंतेत आहे. नोटाबंदीमुळे गरीबांना अतोनात त्रास सोसावा लागला .श्रीमंत कधीही बँकांच्या रांगेत उभे  असल्याचे दिसले नाहीत, हे सत्य आहे.