Mon, Nov 19, 2018 07:28होमपेज › Goa › त्रिमंत्रीय समितीकडून राज्याचा कारभार सुरळीत

त्रिमंत्रीय समितीकडून राज्याचा कारभार सुरळीत

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 18 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी    

राज्य सरकारच्या कारभारावर काँग्रेसने केलेली टीका संयुक्तीक नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीतदेखील सरकार व्यवस्थित कार्यरत असून घटनेच्या 163 (1) कलमानुसार नेमण्यात आलेली त्रिमंत्रीय समिती प्रशासकीय कारभार चांगला चालवत आहे, असा दावा भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी केला. 

काँग्रेसने राज्यपाल मृदूला सिन्हा यांना दिलेल्या निवेदनात, राज्यात सरकार कार्य करत नाही, त्रिमंत्रीय समितीला प्रशासकीय कारभार चालवण्याचा अधिकार नसल्याचा आरोप केला होता. या निवेदनाचा भाजपतर्फे निषेध व्यक्त करताना आमदार काब्राल म्हणाले की, तामिळनाडू राज्यात चारवेळा तत्कालीन मुख्यमंत्री आजारी असताना राज्याचा कारभार चालवण्यासाठी काही मंत्र्यांच्या समितीने व्यवस्थित काम केल्याचे उदाहरण आहे. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सरकारला ‘डोके’च नसल्याची टिपण्णी केली असून ती संयुक्तीक नाही. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष अनेक दिवस अस्तित्वात नाहीत, याचा नाईक यांनी आधी खुलासा करावा. आझाद मैदानात काँग्रेसने अर्धा दिवसाचा सत्याग्रह केला. त्यावेळी काही आमदारही त्यात सामील झाले नसल्याचे लोकांनी पाहिले आहे, असे काब्राल म्हणाले. 

सध्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने गैरहजर असल्याचे आम्ही मान्य करतो. मात्र, पर्रीकर यांच्या अनुपस्थितीतदेखील सरकार व्यवस्थित कार्यरत असून घटनेच्या 163 (1) कलमानुसार नेमण्यात आलेली त्रिमंत्रीय समिती प्रशासकीय कारभार चांगला चालवत आहे. सर्व लोककल्याण योजना सुरळीत सुरू आहेत. पर्रीकर यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाला आम्ही सर्व सध्या मुकत असलो तरी त्यांच्या प्रकृतीच्या बातम्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळोवेळी दिल्या जात आहेत. पर्रीकर पुन्हा राज्यात परतण्याच्या स्थितीत असतील त्यावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार ते जरूर परत येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले. 

Tags : goa news, BJP MLA Nilesh Cabral, claim, Panaji,