Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Goa › मोर्चानंतर अय्यंगार बेकरी बंद  

मोर्चानंतर अय्यंगार बेकरी बंद  

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:09AMमडगाव ः प्रतिनिधी 

निकृष्ट दर्जाची मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ बनवून लोकांच्या आरोग्याशी खेळत असल्याची टीका करून कुडचडे बाजारातील बेंगळुरू अय्यंगार बेकरीवर मोर्चा काढून सदर बेकरी कुडचडेवासीयांनी मंगळवारी बंद पाडली. जमावाने त्यानंतर कुडचडे पालिकेचे मुख्याधिकारी कपिल फडते यांची भेट घेऊन त्यांच्याकडे बेकरीविषयी तक्रार मांडली. त्यावर अन्न आणि औषध प्रशासन जोवर बेकरीची पाहणी करून अहवाल देत नाही तोवर बेकरी उघडू दिली  जाणार नाही, असे फडते यांनी आश्‍वासन दिलेे.

बेकरीत निकृष्ट दर्जाचे पदार्थ बनवून लोकांना विकले जात असल्याचा प्रकार स्थानिक युवकांनी सोमवारी उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन सोमवारी मुख्याधिकारी कपिल फडते यांनी बेकरीला भेट दिली होती. कुडचडे-काकोडा पालिकेने बेकरीवर कोणतीही कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी कुडचडे भागातील लोकांनी मोठ्या संख्येने जमून बेकरी मालकाला सदर बेकरी बंद करण्यास बजावले. जोपर्यंत अन्न आणि औषध प्रशासनाकडून बेकरीची तपासणी होत नाही, तोपर्यंत बेकरी चालू करू नये, असेही जमावाने बेकरी मालकाला सांगितले. 

कुडचडे भाजप गटाचे युवा सरचिटणीस किशन सावंत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे युवा अध्यक्ष राज मलिक, प्रजय वायंगणकर, आशित वेरेंकर, ऋषभ नाईक, शुभम नाईक, कुडचडे  काँग्रेस गटाचे अली शेख, इरफान किल्लेदार, ग्रामस्थ संदीप नाईक, सोहन सावर्डेकर, या प्रकरणाचे तक्रारदार प्रल्हाद देसाई, चिराग राणे व इतर उपस्थित होते.

जमावाने यावेळी बेकरीची पाहणी केली असता बेकरी मालकाने प्लायवूड लावून काही भाग झाकला असल्याचे त्यांना आढळून आले. लोकांनी बेकरी बंद करण्यास सांगितल्यावर बेकरी मालकाने स्वतःहून बेकरी बंद केली. जमावाने नंतर कुडचडे नगरपालिकेत जाऊन नगराध्यक्ष फेलिक्स फेर्नांडिस आणि मुख्याधिकारी कपिल फडते यांची भेट घेतली. फडते यांनी यावेळी बोलताना, आपण या बेकरीविषयी अन्न आणि औषध प्रशासनाला कळवले असून  बेकरीची एफडीएकडून पाहणी होत नाही तोपर्यंत बेकरी बंद ठेवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.

सदर बेकरीला खाद्यपदार्थ विक्री करण्याचा परवाना आहे, पण पदार्थ  बेकरीत बनवण्याची   परवानगी नसल्याचे लोकांनी मुख्याधिकारी फडते यांच्या निदर्शनास आणून दिले असता सदर बेकरीला टाळे ठोकण्यासाठी आपण उपजिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारांशी बोलताना किशन सावंत यांनी सांगितले की, सदर बेकरीवर प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करू. 

राजकीय पक्षांची एकी

एरव्ही श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्ष आसुसलेले असतात, पण या प्रकरणात प्रथमच  भाजप, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड हे तिन्ही राजकीय पक्ष एकत्र आलेले दिसले. या आंदोलनात ‘आप’चे काही कार्यकर्ते, भाजपच्या युवा मोर्चाचे कुडचडे गटाध्यक्ष किशन सावंत, काँग्रेसचे गटाध्यक्ष अली शेख आणि गोवा फॉरवर्डचे युवा अध्यक्ष राज मलिक यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.