Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Goa › अफवांमुळे वैतागलोय : दिगंबर कामत

अफवांमुळे वैतागलोय : दिगंबर कामत

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:40AMमडगाव ः प्रतिनिधी

काँग्रेसच्या दोन आमदारांना घेऊन माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त राष्ट्रीय वाहिन्यांबरोबर सोशल मीडियात  पसरल्याने दिगंबर कामत यांनी संताप व्यक्‍त केला आहे. आपण या अफवांमुळे फार वैतागलो आहोत, असे त्यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. गेले दोन दिवस आपण बेंगळुरू येथे आपल्या मुलीकडे गेलो होतो, पण या गोष्टींची शहानिशा न करता काही लोकांनी आपण भाजपात प्रवेश करण्याच्या निमित्ताने दिल्लीत गेल्याची अफवा पसरवली आहे. यापुढे आपल्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी आपल्याला सर्वांची परवानगी घ्यावी लागणार का, असा संतप्त प्रश्‍न कामत यांनी उपस्थित केला आहे.

दिगंबर कामत काँग्रेसच्या दोन आमदारांना घेऊन भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताने मंगळवार गाजला. काही राष्ट्रीय वृत्त वहिन्यांबरोबर, वेबसाईट आणि सोशल मीडियावर कामत यांच्या भाजप प्रवेशाबद्दल, त्यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार अशा स्वरूपाच्या बातम्या सायंकाळी उशिरा उठू लागल्या होत्या.काही लोकांनी मंगळवारी रात्री कामत यांची गाडी दाबोळी विमान तळावर पाहिल्याने ते भाजपच्या वरिष्ठांना भेटण्यासाठी  दिल्लीत गेल्याचा पोस्ट सोशल मीडियावर टाकून गोंधळात आणखीनच भर घातली  होती.मडगावतील पत्रकार कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानाकडे नजर ठेवून होते. युनायटेड युथ क्लब यांच्याकडून सोमवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी स्पर्धेत कामत यांची अनुपस्थिती नव्हती.शिवाय मंगळवारी मडगाव पालिकेत आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात  कामत  न आल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.कामत यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता.

या संदर्भात दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता आपण या अफवांमुळे वैतागून गेल्याचे त्यांनी सांगितले. आपण काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही हे अनेक वेळा आपण जाहीर केले आहे.तरी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.अशा प्रकारचा कोणताही निर्णय लोकांना लोकांना अंधारात ठेवून घेतला जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

आपण बेंगळुरू येथे आपल्या मुलीकडे गेलो होतो.पण याची शहानिशा न करता अनेकांनी आपण दिल्लीत गेल्याचे वृत्त सर्वत्र पसरवले.आपल्याला सुद्धा खासगी आयुष्य आहे.नातेवाईकांकडे जाण्यासाठी आपल्याला लोकांची परवानगी घ्यावी लागणार काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला .