Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Goa › वास्को पोलिस स्थानकाला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार 

वास्को पोलिस स्थानकाला उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार 

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:42PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

वास्को  पोलिस स्थानकाला  2017  या वर्षासाठीचा उत्कृष्ट पोलिस स्थानकाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्‍त झाला. पणजी  येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर   पोलिस रेजिंग दिनानिमित मंगळवारी आयोजित कार्यक्रमात  पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

पणजी पोलिसस्थानकाला  उत्कृष्ट पोलिस स्थानकाचा दुसरा तर  डिचोली पोलिसस्थानकाला तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार  प्राप्‍त झाला.    उत्कृष्ट सेवा बजावल्याबाबत 21 पोलिस कर्मचार्‍यांना  पोलिस महासंचालक पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित  करण्यात आले.

पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर  म्हणाले की,  यावर्षी पोलिस खात्याची तपासाची टक्केवारी 82 असून मानवी तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 60 हून अधिक  पीडितांची सुटका करण्यात आली.वाहतूक पोलिस खात्याकडून सुरू करण्यात आलेली ‘ट्राफीक सेंटीनल’ योजना ही उत्कृष्टपणे राबवली जात असून यामुळे  वाहन चालक तसेच पादचार्‍यांच्या  सुरक्षेची हमी मिळणार आहे.  

अमलीपदार्थ विरोधी पथकाने  उत्कृष्ट कामगिरी बजावली  असून  यावर्षी पथकाने आता पर्यंत 159 धडक मोहिमा राबवून 81 किलो अमलीपदार्थ साठा जप्‍त केला आहे.  यावर्षी पोलिस खात्यातील 211 कर्मचार्‍यांना बढती देण्यात आली आहे.   वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे  दोन विभाग कार्यान्वित करण्यात आले असून लवकरच अन्य विभागही सुरू केले जाणार आहेत,असे डॉ. चंदर यांनी सांगितले. उत्कृष्ट पोलिसस्थानकाचे  पुरस्कार  संबंधित पोलिसस्थानकाच्या पोलिस निरीक्षकांनी  स्वीकारले. पणजी पोलिसस्थानकाला सलग  तिसर्‍या  वर्षी उत्कृष्ट पोलिसस्थानकाचा पुरस्कार प्राप्‍त झाला आहे.