पणजी : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी हळदोणे येथील मार्टीन सुआरीस (वय 69) याला गोवा बाल न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली. त्याचबरोबर त्याला 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
सदर प्रकरण हे एप्रिल 2012 मधील आहे. या लैंगिक अत्याचार प्रकरणी सुआरीस याला बाल न्यायालयाने 15 फेब्रुवारी 2018 रोजी दोषी ठरवले होते. बाल न्यायालयाच्या न्यायाधिश वंदना तेंडूलकर यांनी हा निवाडा सुनावला. सरकारी वकील म्हणून अॅड. के. संजगिरी यांनी तर आरोपीच्या वतीने एम.मिनेझिस यांनी बाजू मांडली.
किटला हळदोणे येथील आपल्या घरातील बाथरुममध्ये एप्रिल 2012 मध्ये मार्टीन याने 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याची माहिती पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला दिली. मैत्रिणीने ही माहिती आपल्या आईला व त्यानंतर मैत्रिणीच्या आईने पीडित मुलीच्या आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी 15 मे 2012 रोजी म्हापसा पोलिस स्थानकात गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता.