Sat, May 25, 2019 22:39होमपेज › Goa › वाजपेयींच्या अस्थींचे गोव्यात विसर्जन

वाजपेयींच्या अस्थींचे गोव्यात विसर्जन

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMपणजी : प्रतिनिधी

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे राज्यातील लाखो लोकांनी दोन दिवस दर्शन घेतले. त्यानंतर या अस्थिकलशाचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते पणजी येथील मांडवी नदीत आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते कुठ्ठाळी येथे जुवारी नदी पात्रात शुक्रवारी संध्याकाळी विधीवत विसर्जन करण्यात आले. भारतातील एकूण 97 नद्यांमध्ये एकाचवेळी स्व. वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन  करण्यात आले. 

दक्षिण आणि उत्तर गोव्यातील विविध गावांत प्रदेश भाजपतर्फे गुरूवार व शुक्रवार असे दोन दिवस वाजपेयी यांच्या अस्थींच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. वाजपेयी यांच्या अस्थींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यभरातील अनेक नागरिक, भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती. 

पणजीतील बंदर कप्तानच्या जेटीवर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता फुलांनी सजवलेल्या एका क्रुजबोटीवर अस्थी आणण्यात आल्या. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  उपचारांसाठी मुंबईला गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मांडवी पात्रात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार ग्लेन टिकलो, प्रवीण झांट्ये, राजेश पाटणेकर, माजी आमदार  दयानंद मांद्रेकर, सरचिटणीस सदानंद तानावडे तसेच अनेक भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते. 

भारत हा जागतिक स्तरावर एक शक्तीशाली देश तसेच महासत्ता बनावी, असे वाजपेयी यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांवर आहे. हे स्वप्न पूर्ण करणे हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरू शकते. - लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री  

वाजपेयी यांनी देशाच्या प्रगती आणि विकासासाठी निस्व:र्थीपणाने काम केले होते. त्यांच्या जाण्यामुळे देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी जाणवणार आहे. - श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्री