होमपेज › Goa › अर्थसंकल्प गुरूवारी

अर्थसंकल्प गुरूवारी

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 20 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी एक महिन्यावरून चार दिवसांचा करण्याचा निर्णय सोमवारी  विधानसभेच्या कामकाज सल्‍लागार समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. अधिवेशन गुरुवार दि.22  पर्यंत चालणार असून त्याच दिवशी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला जाईल, अशी माहिती बैठकीनंतर सभापती डॉ.प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना  दिली. 

राज्य विधानसभेचे अधिवेशन 19 फेब्रुवारी  ते 21 मार्चपर्यंत होणार होते. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर  स्वादूपिंडाच्या विकाराने आजारी असून त्यांच्यावर मुंबईत लिलावती इस्पितळात उपचार सुरू असल्याने अधिवेशनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभापती डॉ.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 

सभापती डॉ. सावंत  म्हणाले, विधानसभा कामकाज सल्‍लागार  समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या पुढील तीन दिवसांच्या कामासंदर्भात निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी (दि.19)राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या अभिभाषणाने सुरुवात करण्यात आली. मंगळवार दि.20, बुधवार दि.21 व गुरुवार दि. 22 रोजी  प्रश्‍नोत्तराचा तास, शून्य तास व लक्षवेधी सूचना चर्चेस घेतल्या जातील. मंगळवार व बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत चर्चा होईल. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची सभागृह नेतेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्री ढवळीकर हे विधानसभेत उत्तर देतील.

राज्याचा अर्थसंकल्प गुरुवार दि.22 रोजी विधानसभेत मांडला जाणार आहे. मात्र, अर्थसंकल्प कोण मांडणार यावर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. चालू अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार नसल्याचेही सावंत यांनी यावेळी  स्पष्ट केले. विधानसभा कामकाज  समितीच्या बैठकीला उपसभापती मायकल लोबो, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.