Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Goa › आसामी जोडप्याची पणजीत आत्महत्या

आसामी जोडप्याची पणजीत आत्महत्या

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:37AMपणजी : प्रतिनिधी

सांतिनेझ पणजी येथे भाड्याच्या खोलीत राहणार्‍या मूळच्या आसाममधील जोडप्याचे मृतदेह मंगळवारी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आत्महत्या केलेल्या पतीचे नाव श्रीमंता बोरा (वय 31) व पत्नीचे नाव रिम्पी बोरा (23) असे आहे. रिम्पी हिचा मृतदेह खोलीत असलेल्या खाटेवर तर पती श्रीमंता याचा मृतदेह पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. श्रीमंता याचे हात पाठीमागून वायरने बांधलेले असल्याचे  आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले.

पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांतिनेझ टी. बी. इस्पितळाशेजारी असलेल्या एका भाड्याच्या खोलीत राहणार्‍या जोडप्याने आत्महत्या केल्याचा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला सकाळी  11.15 वाजता आला. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. रिम्पी ही पणजी येथील एका  शॉपिंग मॉलमध्ये कामाला होती, तर श्रीमंता हा पणजीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. दोन वर्षांपूर्वी हे जोडपे या भाड्याच्या खोलीत राहण्यास आले होते, असे पोलिसांनी सांगितले. प्रथमदर्शनी सदर प्रकार हा आत्महत्या असल्याचे दिसून येत असले तरी मृत्यूचे नेमके कारण शवचिकीत्सा झाल्यानंतरच समजणार आहे. दोन्ही  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आले असून  पुढील तपास सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक वेळीप यांनी सांगितले.