Fri, Apr 19, 2019 12:43होमपेज › Goa › अष्टमीची फेरी यंदा मांडवी तीरावर : महापौर चोपडेकर

अष्टमीची फेरी यंदा मांडवी तीरावर : महापौर चोपडेकर

Published On: Aug 25 2018 1:13AM | Last Updated: Aug 25 2018 1:13AMपणजी : प्रतिनिधी

गणेश चतुर्थीनिमित्त पणजीत भरणारी अष्टमीची फेरी यंदा 2 ते 14 सप्टेंबर या काळात मांडवी तीरावर आयोजित करण्याचा निर्णय पणजी मनपाच्या शुक्रवारी पार पडलेल्या विशेष बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी दिली. अष्टमीच्या फेरीत स्टॉल्स् उभारणार्‍या दुकानदारांना प्रती मीटर 30 रुपये इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

चोपडेकर म्हणाले की, वर्ष पध्दतीप्रमाणे यंदादेखील अष्टमीची फेरी भरवली जाणार आहे.  अगोदर ही फेरी कला अकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तेथे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला. कांपाल येथील परेड मैदान व फुटबॉल मैदान हे दोन पर्यायदेखील समोर ठेवण्यात आले होते. परंतु त्यावरही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे  मांडवी तीरावर अष्टमीची फेरी भरवण्यासंदर्भात चर्चा झाली. परंतु तेथे फेरी न भरवण्यासंदर्भात न्यायालयाचे निर्देश असल्याने मनपाच्या  कायदेशीर सल्‍लागारांकडे चर्चा करुन त्यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार यंदा अष्टमीची फेरी मांडवी तीरावर  आयोजित करण्याचा निर्णय या विशेष बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनपाकडून हा निर्णय उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पालिका प्रशासन खात्याला कळवण्यात येईल. मांडवी  तीरावरील पदपथाची लांबी पुरेशी असून 4 मीटर पदपथ लोकांसाठी खुला ठेवण्यात येणार असून त्या जागेत फेरी भरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

अष्टमीच्या फेरीठिकाणी स्टॉल्स उभारण्यास इच्छुक असलेल्या दुकानदारांनी 29 ऑगस्टपर्यंत  मनपाकडे अर्ज सादर करावेत. फे रीच्या ठिकाणी  बायो टॉयलेटदेखील उभारले जाणार असल्याचे चोपडेकर यांनी सांगितले.