Tue, Mar 19, 2019 03:14होमपेज › Goa › कलाकार, निर्मात्यांना महोत्सवांमुळे प्रोत्साहन

कलाकार, निर्मात्यांना महोत्सवांमुळे प्रोत्साहन

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:51AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याची चित्रपटसृष्टी बर्‍यापैकी नावलौकीक मिळवत असून, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सुरू झाल्यानंतर राज्यात विविध चित्रपट महोत्सव होत आहेत. याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जाते. चित्रपट महोत्सवांमुळे गोमंतकीय निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना चित्रपट निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळत आहे, असे प्रतिपादन वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. गोवा मनोरंजन संस्थेतर्फे आयोजित 9 व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ढवळीकर बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गोमंतकीय सिनेसृष्टी उभी राहण्यासाठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तसेच कलावंतांना बहुमोल मदत केली आहे.

व्यासपीठावर खासदार नरेंद्र सावईकर, ईडीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव दौलत हवालदार, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय अभ्यंकर, उपाध्यक्ष राजेंद्र तालक व सचिन चाटे उपस्थित होते.खा. सावईकर म्हणाले, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची चित्रपटांमुळे ओळख व लौकीक वाढत  आहे. मुख्य म्हणजे नवीन पिढी या क्षेत्राकडे  वळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भविष्यातही दर्जेदार चित्रपट गोव्यात बनविले जातील, अशी आशा  त्यांनी व्यक्त केली. 

राजेंद्र तालक म्हणाले, दरवर्षी राज्य चित्रपट महोत्सव भरारी घेत आहे. गोमंतकीय चित्रपटांना मदत व्हावी, यासाठी संस्था प्रयत्नरत आहे. महोत्सवात प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या निर्मात्यांना मानचिन्ह देऊन उद्घाटनप्रसंगी सन्मानित करण्यात आले. ‘के सेरा सेरा’ या चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ झाला व त्यानंतर  ‘मार्टिन्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. 

आजचे चित्रपट

महोत्सवात दि.4 मे रोजी चार चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. दुपारी 12 वाजता ‘बिग बेन’,   त्यानंतर  दुपारी 2.30 वाजता ‘कनेक्शन’,  सायंकाळी 5.30 वाजता ‘महाप्रयाण’ व  सायं. 7.30 वाजता ‘व्हॉर ऑन’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. हे सर्व चित्रपट मॅकनिझ पॅलेस 1 मध्ये प्रदर्शित केले जातील.

Tags : Goa, Artists, creators, encouraged,  festivals