Wed, Nov 14, 2018 04:28



होमपेज › Goa › कुडका ग्रामसभेत दुसर्‍यांदा ‘पीडीए’विरोधी ठराव

कुडका ग्रामसभेत दुसर्‍यांदा ‘पीडीए’विरोधी ठराव

Published On: Feb 26 2018 12:42AM | Last Updated: Feb 26 2018 12:02AM



पणजी (प्रतिनिधी)

कुडका-बांबोळी-तळावली ग्रामसभेने रविवारी दुसर्‍यांदा ‘ग्रेटर पणजी पीडीए’त समाविष्ट करण्यास विरोध करणारा ठराव मंजूर केला. या छोट्या पंचायत घरात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी करून बाहेर रस्त्यावरही लोक उन्हात उभे राहिले होते.

स्थानिक आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांना सर्व पंचायतींनी रविवारच्या ग्रामसभेला येण्याचे आमंत्रण देऊनही ते अनुपस्थित राहिल्याने  गावकर्‍यांनी उघड नाराजी व्यक्त केली. जर आमदार जनतेबरोबर 
आहेत, तर त्यांनी पीडीए सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची लोकांनी जोरदार मागणी केली. आमदार सिल्वेरा यांनी विधानसभेत स्थानिक चर्चच्या फादरकडून पीडीएला विरोध होत असल्याचे विधान केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा निषेध केला. लोकांच्या चळवळीमध्ये चर्च संस्थेला ओढू नये, अशी मागणी काहींनी केली. पीडीए तयार करताना कुठला भाग त्यात टाकण्यात आला याची माहिती जनतेला का देण्यात आली नाही, अशी विचारणाही करण्यात आली. सरपंच मारिया डिकुन्हा यांनी आपण या  मुद्यावर लोकां सोबत राहणार असून  पीडीएतील सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे सांगितले. या विधानाचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून  जोरदार स्वागत केले. या सभेत अ‍ॅड. सुरेश पालकर यांनी पीडीएत गावाचा समावेश झाल्यावर तांत्रिकदृष्ट्या काय अडचणी येतील याची माहिती सभागृहात मांडली.  सभेत माजी सरपंच प्रकाश सावंत, रामा काणकोणकर व अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडले.